महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सरकारने सन्मानित करावे – डॉ. सतीश ससाणे
अहमदपूर, ( गोविंद काळे) : भारतात ज्या काळात सर्वसामान्यांना शिक्षण घेण्याची बंदी होती, त्या काळात स्त्री -शूद्रातिशूद्र, शेतकरी, बहुजन वर्गातील वंचितांना शिक्षणाची दारे खुली करून देऊन महात्मा फुले यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केलेली आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब देऊन विनाविलंब सन्मानित करावे, असे आवाहन समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. सतीश ससाणे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महात्मा फुले जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सतीश ससाणे हे बोलत होते. महात्मा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी भूषविले.
यावेळी पुढे बोलताना डॉ. सतीश ससाणे म्हणाले की, महात्मा फुले यांनी केवळ शैक्षणिक कार्य केले असे नव्हे; तर सामाजिक प्रबोधनाचे कार्य अखंडपणे पार पाडले. अखंडादि काव्य, तृतीय रत्न नाटक, सत्सार, शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी आदी ग्रंथ लिहून महात्मा फुले यांनी भारताचा खरा इतिहास शोधला आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाला जगण्याची नवी दिशा दिली, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की महात्मा फुले यांनी केवळ वंचितांसाठी नव्हे; तर समस्त भारतीयांसाठी कार्य केले. महात्मा फुले यांचे विविध क्षेत्रातील कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी असून, त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. यावेळी ह. भ. प. प्रो.डॉ.अनिल मुंढे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. संतोष पाटील, प्रा. प्रकाश गायकवाड , कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, वामन मलकापुरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
