इनरव्हील क्लब तर्फे लोणी येथे झोपडीतील अंधार दूर करण्यासाठी सोलर लॅम्पचे वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) : लोणी येथील झोपडपट्टीवासीयांना कायम स्वरुपी लाईटची सोय नसल्याने होणारा अंधाराचा त्रास घालवण्यासाठी इनरव्हील क्लबच्या वतीने 50 घरात सोलर लॅम्पचे वाटप करण्यात आले. या गरजू लोकांच्या घरातील अंधार दूर करून प्रकाशमय करताना आपला हा खारीचा वाटा खूप आनंद देऊन गेला, असे मत प्रोजेक्ट प्रमुख सुहासिनी सुरशेटवार यांनी व्यक्त केले.
या उपक्रमासाठी इनरव्हील अध्यक्षा सौ. मीरा चंबुले, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, एडिटर पल्लवी मुक्कावार तसेच सदस्य प्रिया नरखेडे, नेहा जैन,योजना चौधरी, डॉ तृप्ती दाचावार यांची उपस्थिती होती.
सामाजिक जाणीवा जपत समाजातील गोरगरीब उपेक्षित घटकांना मदतीचा हात देऊन आपल्या परीने त्यांना सहकार्य करणाऱ्या इनरव्हील क्लबचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कधी मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून चौकाचौकांनी जनावरांसाठी पाणपोईची सुविधा, तर कधी भर उन्हात देखील पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला राहून कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांना मदत म्हणून इनर व्हील क्लब ब्रांडेड मोठ्या छत्र्याचे वाटप करून, चप्पल बूट शिवणारे, भाजी विकणारे, ठेलेवाले यांना सहकार्य करून त्यांच्यावर मायेची सावली धरणाऱ्या इनरव्हील क्लबचे कौतुक केले जात आहे. अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजातून ज्यांना दुर्लक्षित केले आहे, उपेक्षित ठेवले आहे. अशा लोकांची सेवा करण्यामध्ये धन्यता मानत समाजसेवेची खऱ्या अर्थाने रुजवन करणाऱ्या, मात्र हृदयी समाजसेविका असलेल्या सर्व सदस्यांचे विविध गटातून ऋण व्यक्त करण्यात येत आहे.
