महात्मा फुले महाविद्यालयाच्या समीक्षा कांबळे व कोमल पोलेचा ‘स्वारातीम’ विद्यापीठाने केला हृद्य सत्कार

महात्मा फुले महाविद्यालयाच्या समीक्षा कांबळे व कोमल पोलेचा 'स्वारातीम' विद्यापीठाने केला हृद्य सत्कार

अहमदपूर, ( गोविंद काळे ) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुणवत्तेच्या क्षेत्रामध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. समीक्षा शेषराव कांबळे सर्वप्रथम तर, कु. कोमल संभाजी पोले ही विद्यार्थिनी बी.ए. कला शाखेत विद्यापीठात सर्व तृतीय आली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये ‘फुले पॅटर्न ‘ निर्माण केला आहे. २००९ पासून गुणवत्ता यादीत तसेच २०१६ पासून विद्यापीठात प्रथम, द्वितीय तसेच विविध विषयांमध्ये सुवर्णपदक व रोख रक्कमेचे पारितोषिक प्राप्त करण्याचा मान महात्मा फुले महाविद्यालयाला मिळाला आहे.

हीच यशाची परंपरा कायम ठेवत उन्हाळी २०२२ च्या परीक्षेत बी. ए. कला शाखेत विद्यापीठातून प्रथम व ऐच्छिक इंग्रजी विषयात सर्वप्रथम येण्याचा मान पुन्हा एकदा कु. समीक्षा शेषराव कांबळे या विद्यार्थिनींच्या रूपाने मिळाला असून याच परीक्षेत विद्यापीठातून सर्व तृतीय व ऐच्छिक संस्कृत विषयात सर्वप्रथम येण्याचा मान कु. कोमल संभाजी कांबळे या विद्यार्थिनीनी मिळविला.

याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पुरस्कार वितरण समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्यासह प्र. कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक शशिकांत महावरकर, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे व मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे यांच्या हस्ते गुणवत्ता संपादन केल्याबद्दल गुणवत्ता प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतिश आकडे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने, डॉ. सचिन गर्जे आदी उपस्थित होते.

याबद्दल यशस्वी विद्यार्थिनींचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी तसेच प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!