देवणीत चौकातील खड्डा बनला जीवघेणा
देवणी (प्रतिनिधी) : येथील बोरोळ चौकातील मुख्य रस्त्याच्या नालीवरील स्लॅब कोसळल्याने बोरोळ कडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन भागात विभाजन होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.जणु हा खड्डा म्हणजे मौत का कुआँ अशीच चर्चा वाहनधारकांतून होत आहे. ऐन वळणावरच छत कोसळल्याने वाहनांची चाके नाल्यात उतरायला लागल्याने शहरातील मुख्य चौकच अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे.निलंगा– उदगीर आंतरराज्य महामार्गाचे काम चालू असून शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा सिमेंट काँक्रीटच्या नालीचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. शहरातील बोरोळ चौक हा मुख्य चौक असून कर्नाटकात जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग असल्याने सर्वाधिक वाहनांची रहदारी या मार्गावर राहत असते. पण या चौकातून बोरोळकडे जाण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या नालीवरून जावे लागते. परिणामी वाहनांचा भार सहन न झाल्याने रस्त्याच्या मध्यभागी व ऐन वळणालाच नालीवरील छत कोसळले असून दुरून वाहन चालकांच्या लक्षातच येत नसल्याने अपघात होत आहेत.त्यामुळे लवकरात लवकर नालीवरील छताची दुरुस्ती करावी, व निकृष्ट कामाची संबंधित विभागाकडून चौकशी करण्याची मागणी प्रवाशी व वाहनचालकांकडून केली जात आहे.
