यशस्वीतेसाठी योग्य नियोजन, सातत्य आणि चिंतनाची गरज – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी हा सुसंस्कारित होऊनच बाहेर पडतो. सुसंस्कार, चारित्र्य संपन्नता आणि ज्ञान ही या महाविद्यालयाची वैशिष्ट्ये असून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वीतेसाठी योग्य नियोजन, सातत्य आणि चिंतनाची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या निरोप समारंभ प्रसंगी अध्यक्षपदावरून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी व इतिहास विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास, नियोजन, चिंतनाबरोबरच परिश्रमाची पराकाष्ठा केली पाहिजे. एका बाजूला बेकारी असल्याचे दाखवले जाते. परंतु दुसऱ्या बाजूला योग्य आणि लायक उमेदवार मिळत नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना डॉ. बब्रुवान मोरे म्हणाले की, वेळ हा मानवी जीवनात सर्वात मौल्यवान घटक असून, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच वेळेचे योग्य नियोजन केले तर त्यांना कधीच अपयश येणार नाही.
तसेच, याप्रसंगी बोलतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी काळाच्या एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. येणारा काळ हा स्पर्धेचा असून, प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविण्याची आज गरज आहे. यावेळी ससा आणि कासव यांची गोष्ट सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यावेळी बीए तृतीय वर्षाच्या जुफिशा शेख, आरती गवळी ,धनश्री कांबळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयातील बी.ए. प्रथम वर्ष आणि बी.ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञा रायभोळे यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी स्वामी यांनी केले ; तर आभार प्रदर्शन अमोल बनसोडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
