भारतरत्न बाबासाहेबां आंबेडकराची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी – डॉ. सतीश ससाणे
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची स्थापना
अहमदपूर, (गोविंद काळे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही नाचून नाही तर ती ग्रंथसंपदा वाचून साजरी करायला हवी असे प्रतिपादन प्रसिद्ध सामशास्त्राचे अभ्यासक डॉ. सतीश ससाणे यांनी केले.
डॉ.सतीश ससाणे हे अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते.तर प्रमुख उपस्थितीत डॉ.सतीश ससाणे,प्रा.प्रकाश गायकवाड, हे.भ.प. अनिल महाराज मुंढे,अजय मुरमुरे हे होते.
पुढे बोलताना डॉ.सतीश ससाणे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अभ्यास केला होता
तसेच बाबासाहेब हे स्वातंत्र्य,समता आणि बंधुताचे जनक असून जगातील नंबर एकचे विचारवंत आहेत. बाबासाहेब हे पुस्तकात, मस्तकात, न्यायालयासह सर्वत्र आहेत.म्हणून त्यांची जयंती नाचून नाही तर ती ग्रंथसंपदा वाचून साजरी केली पाहिजे असे म्हणाले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी त्यांनी महाविद्यालयात भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा करून या केंद्राचे संचालक म्हणून डॉ. सतीश ससाणे यांना नियुक्ती पत्र दिले.
प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.षब्रुवान मोरे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचलन केले.तर आभार ह. भ. प. प्रो. अनिल महाराज मुंढे यांनी मानले. यावेळी समाजशास्त्र विषयाच्या वतीने अकराव्या भित्तीपत्रकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास फिजा, नूरजहाँ यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच चंद्रकांत शिंपी यांच्या सह कार्यालयीऊबांधव उपस्थित होते.
