बाजार समितीच्या निवडणुका नाना पटोले यांच्या आदेशाला केराची टोपली!! उदगीरात काँग्रेस भलतीच कोपली?

बाजार समितीच्या निवडणुका नाना पटोले यांच्या आदेशाला केराची टोपली!! उदगीरात काँग्रेस भलतीच कोपली?

उदगीर(एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यातील सीमा वरती भागातील आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि मोठी बाजारपेठ असलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रंगत वाढू लागली आहे. याच दरम्यान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडीचा धर्म पाळण्याच्या संदर्भात सर्व मित्र पक्षांना आवाहन केले आहे. बाजार समिती आणि खरेदी विक्री संघ निवडणुकीमध्ये कुठेही भाजप आणि शिंदे गटाशी हात मिळवणी करू नये. जेणेकरून सहकार संस्थांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित होईल, आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मित्र पक्षांनाच अडचणी निर्माण होतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आघाडीचा धर्म पाळावा. काही ठिकाणी मित्रपक्षाकडून आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत, अशी खंतही नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. हे पक्ष शिस्तीचे उल्लंघन आहे. अशी अभद्र युती करणाऱ्या वर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सुरू आहेत, तर कोणत्याही क्षणी खरेदी विक्री संघाच्या ही निवडणुका जाहीर होतील. अशी परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने त्याचीही जुळवा जुळव सुरू असतानाच आघाडीचे काही उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या किंवा शिंदे गटाच्या संपर्कात असून तशी तयारी करत असल्याची कार्यकर्त्यांनी तक्रार केल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले आहे. वास्तविक पाहता त्या त्या तालुका आणि जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांनी आपल्या परीने निर्णय न घेता पक्ष शिस्तीचे पालन करावे, कोणत्याही प्रकारे पक्ष शिस्तीचा भंग केल्यास खपवून घेतले जाणार नाही. असा आदेशही त्यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी अबाधित राहिली पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. असेही नाना पटोले यांनी नमूद केले आहे. असे असले तरीही उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात आघाडीच्या धर्माला कोलदांडा घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक बडे बडे नेतेमंडळी पडद्याआडून काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपच्या ताटाखालचे मांजर बनले असल्याची चर्चा खुलेआम चालू आहे. तर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी उघड उघड काँग्रेस पक्षाच्या वतीने यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रभावीपणे सत्ता गाजवलेल्या संचालक मंडळावरच भ्रष्टाचाराचे आरोप करून निवडणुकीमध्ये वेगळाच रंग भरला आहे. या सर्व प्रकारामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे हे सध्या जपानच्या अभ्यास दौऱ्यावर असून त्यांच्या अनुपस्थितीमध्ये प्रोटोकॉल च्या नावाने नेतेगिरी करणारे काही जण राष्ट्रवादीला वेशीला टांगायच्या तयारीला तर लागले नाहीत ना? अशीही चर्चा चालू आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रमुख विरोधी दावेदार असला तरीही भाजपच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर ताशेरे ओढायला सुरुवात केल्याने, भाजपाचे काम खूप सोपे झाले आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरीही काँग्रेस पक्षाची ताकद फार मोठी आहे. हे नाकारता येणार नाही, मात्र ठीक ठिकाणी सत्तेच्या बळावर काँग्रेसचे खच्चीकरण करून नाकेबंदी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी मधून बुरख्यातून राजकारण करणाऱ्या, कूटनीतीचा वापर करून आपणच फार मोठे नेते आहोत, असे दाखवणाऱ्या काही लोकांची कृष्णकृत्य या निवडणुकीत चव्हाट्यावर येतील! अशी शक्यता वर्तवली जात आहे. आघाडीचा धर्म नाही पाळण्यास किंवा उघड उघड भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला राष्ट्रवादीने सहकार्य केल्यास त्याचे दूरगामी परिणाम दिसून येऊ शकतात.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, माजी उपसभापती रामराव मामा बिरादार, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक लक्ष्मीताई भोसले यांच्यासह काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रचाराला लागले असून आमदार संजय बनसोडे हे आमच्या सोबतच आहेत. त्यांच्या नावाचा कोणी बाऊ करू नये, काही कार्यकर्ते चुळबुळ करत असले तरीही योग्य वेळी त्यांना समज दिली जाईल. असा विश्वास काँग्रेस जणांना वाटतो आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भगवानदादा पाटील तळेगावकर, काही तांत्रिक मुद्द्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले माजी सभापती शिवाजी अण्णा हूडे, शिवाजीराव केंद्रे यांना सोबत घेऊन माजी आमदार सुधाकरराव भालेराव हे चांगली रणनीती आखत आहेत. त्यांच्या चक्रव्यूहात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मासे अडकल्याची चर्चा रंगत आहे. सद्यस्थितीत शिवसेना, भाजपा युतीचे सरकार असल्याने भाजपचे वर्चस्व आबधीत राहावे म्हणून प्रयत्न केले जात असून या प्रयत्नाला आघाडीतील काही लोकांनी सहकार्य केल्यास भाजपाला ही निवडणूक फारशी जड जाणार नाही. मात्र आघाडीतील घटक पक्ष एकसंघ राहिल्यास आणि योग्य पद्धतीने लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांनी घालून दिलेला पायंडा आणि बाजार समितीच्या माध्यमातून राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांची योग्य पद्धतीने माहिती मतदारापर्यंत पोहोचवल्यास महाविकास आघाडी पॅनलला ही निवडणूक अवघड जाणार नाही. मात्र “घर का भेदी लंका ढाए!”या सूत्राकडे महाविकास आघाडीने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अन्यथा येणाऱ्या निवडणुकात काँग्रेसची नाराजी निश्चितपणे दिसून आल्याशिवाय राहणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र कापूस फेडरेशनचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत भाऊ चामले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार आणि अजित दादा पवार यांचे निकटवर्ती म्हणून भरत भाऊ चामले ओळखले जात असल्याने त्यांच्या सूचनामुळे देखील या निवडणुकात सकारात्मक परिणाम होऊ शकेल, अशी ही अपेक्षा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे चिन्ह दिसत असले तरीही मतदान प्रक्रिया यशस्वी करून घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांचे अधिकृत पॅनल साम, दाम, दंड, भेद या राजनीतीचा वापर करून प्रभावशाली कार्य करतील. प्रश्न आहे बंडखोरांचा नेमका परिणाम कोणावर होईल? भारतीय जनता पक्षाला जरी वाटत असले, महाविकास आघाडीतील बिघाडी आपल्या पथ्यावर पडणार आहे. तरी देखील भाजपातील काही निष्ठावंत, भाजपमधील आयाराम गयारामावर प्रचंड नाराज असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना केवळ सतरंज्याच उचलायला लावणार का? निष्ठावंताचा विचार नाही केल्यास त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील. असाही गर्भित इशारा भाजपाला आत्मचिंतन करायला लावणार आहे.

खर 21 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेना भाजप युती सरकारने शेतकऱ्यांमधून कोणीही जो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी आहे, त्याला बाजार समितीच्या संचालकासाठी थांबता येते, असा निर्णय घेतल्याने यावेळी शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत निश्चितच गुंतागुंत निर्माण होणार आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज असल्याने आपापल्या संबंधातील बंडखोर उमेदवारांना त्यांची मनधरणी करून उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी विनवण्या करण्याचे कार्य चालू असल्याचीही चर्चा रंगत आहे.

About The Author

error: Content is protected !!