तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला भाकरी ही आपली संस्कृती आहे – ह. भ. प. डॉ.तेलगाणे

तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला भाकरी ही आपली संस्कृती आहे - ह. भ. प. डॉ.तेलगाणे

उदगीर (एल.पी.उगीले) : जगामध्ये भारतीय संस्कृती आदर्श समजली जाते, त्याचे एकमेव कारण म्हणजे प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा सल्ला देतानाच, तहानलेल्या जीवाला पाणी उपलब्ध करून देणे आणि जो भुकेला जीव असेल, त्याला भाकरी देणे ही आपली संस्कृती आहे. अशी आदर्श शिकवण संस्कृती आपल्याला देते, त्याची जपवणूक करणे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. असे विचार ह.भ.प. डॉ. शरद कुमार तेलगाने यांनी व्यक्त केले. ते डॅमरोड येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक येथे पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी उदगीर येथील सुप्रसिद्ध उद्योगपती सुरेश महाजन, संतोष गाजरे, विजय तेलंगे, अमोल गाजरे, संजय सूर्यवंशी, देविदास गायकवाड यांच्यासह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. तेलगाने म्हणाले की, या समाजामध्ये आपण राहतो, समाजातील प्रत्येक घटक आपल्याला मदत करत असतो. आपल्या जडणघडणीमध्ये समाजाचा सिंहाचा वाटा असतो. त्याचे भान ठेवून सामाजिक जाणीव जपल्या पाहिजेत. त्याच भूमिकेतून आपण राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, हमाल, मापाडी यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. या उद्देशाने पानपोई सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता पाण्याची टंचाई विचारात घेऊन, ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी, कष्टकरी यांना कोणी पाणी देत नाही. शुद्ध पाण्या अभावी कित्येक वेळा वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागते. गोरगरिबांना रोजी रोटी साठी भटकंती करत असताना आजाराकडे लक्ष देणेही शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे. या हेतूनेही पानपोई आपण सुरू केली आहे. पानपोई सुरू करणे म्हणजे फार मोठे काम नाही, परंतु त्या मागची भूमिका आणि उद्देश पवित्र आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार अमोल गाजरे यांनी व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!