अध्यात्माला विज्ञानाची जोड देण्यासाठी शिक्षण प्रवाह गतिमान करणार – प्रतिभा मुळे

अध्यात्माला विज्ञानाची जोड देण्यासाठी शिक्षण प्रवाह गतिमान करणार - प्रतिभा मुळे

उदगीर (एल. पी. उगिले) : विद्यार्थ्यांना गावांमध्ये होणाऱ्या अध्यात्मिक कार्यक्रमाची गोडी असते, त्यात ते रमतात. हे ठीक आहे, मात्र या सोबतच विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढावी, त्यांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे, यासाठी आपल्या गावातील विद्यार्थ्यापासून सुरुवात करावी, म्हणून शिक्षण विभागातील कर्तबगार अधिकारी प्रतिभा मुळे यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर देत आपल्या गावातील अर्थात जि.प.प्रा.शाळा मोर्तळवाडी ( नळगीर ) येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने 100 सुलेखन वह्यांचे व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करून एक नवीन आदर्श पायंडा घातला आहे.

श्रीमती प्रतिभाताई मुळे (कोठारे ) यांनी आपल्या गावच्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर व्हावे, यासाठी उन्हाळी सुट्टीतील हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास 04 सुलेखन वह्या, 01 पेन्सिल , 01 खोडरबर व 01 शार्पनर दिले.

सुलेखन वही क्रमांक 01 ते 04 गिरवल्या नंतर हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. हाताला वळण बालपणीच लागते . गुणवत्ता वाढीसाठी हस्ताक्षर महत्वाचे असते . कारण गुणवत्ता ही लेखी स्वरूपात तपासली जाते. सुंदर हस्ताक्षर हा व्यक्तिचा दागिणा असतो. ज्याच्यामुळे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. सप्ताह निमित्त्य गावात सात दिवस अध्यात्मिक सोहळा चालतो, यामध्ये वेगवेगळे महाराज येऊन प्रबोधन करत असतात. यासोबतच गावाचा विकास होण्यासाठी बालकांकडे लक्ष देणे किती महत्वाचे आहे, हे पटवून देण्यासाठी शिक्षणाचा जागर घालत शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आपल्या गावातील विद्यार्थी आदर्श व्हावा, तो उच्चपदस्थ व्हावा, हा संदेश देत आपल्या गावचे विद्यार्थी IAS , IPS होण्यासाठी गावात एक समृद्ध वाचनालय व अभ्यासिका तयार करण्याचा मानस यावेळी प्रतिभा मुळे यांनी मांडला. येत्या काळात तोही पूर्ण होईल.गावासाठी त्या विविध उपक्रम राबवत असतात. कोविड नंतर 2021 ला गावकऱ्यांना शेतात लावण्यासाठी आवळा , चिंच ,पिंपळ व कडूलिंब यांची 1500 रोपे दिली. याच कल्पनेतून गावकऱ्यांनी बसस्टॅन्डपासून गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा राज्यमंत्री आ. संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला. आज मोर्तलवाडी गावात प्रवेश करत असताना एखाद्या गार्डनमध्ये जात असल्याचे वाटते. अतिशय सुशिक्षित असलेल्या या गावाचे सौंदर्य वाढवण्यासाठी घेतलेल्या उपक्रमात गावातील तरुण मंडळी नेहमीच पुढाकार घेतात.

About The Author

error: Content is protected !!