जुगार अड्ड्यावर धाड ! सापडले जवळपास दीड लाखाचे घबाड!!
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे बोकळले म्हणून प्रसिद्धी माध्यमातून ओरड होत होती. या गोष्टीकडे वाढवणा पोलिसांनी गांभीर्याने घेत वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील हळी ते अहमदपूर जाणाऱ्या रोडवर, पश्चिम बाजूला हळी शिवारातील बाबुराव काळे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली तिरट नावाचा जुगार स्वतःच्या फायद्यासाठी खेळत व खेळवीत असताना, वाढवणा पोलिसांनी धाड टाकून आरोपी मनोहर नामदेव मसुरे (वय 38 वर्ष व्यवसाय मजुरी, रा. हळी) एजाज शौकत चौधरी (वय 34 वर्ष व्यवसाय मजुरी रा. हंडरगुळी) इब्राहिम हिराजी चौधरी (वय 41 वर्ष व्यवसाय मजुरी रा. हंडरगुळी) इस्माईल मदर शेख (वय 38 वर्षे व्यवसाय मजुरी रा. हंडरगुळी) या चौघा विरुद्ध मुंबई जुगार कायदा अन्वये गु.र.क्रमांक 88 /23 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल दयानंद भिमराव सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य पत्ते, रोख रक्कम 12890 रुपये आणि दोन वापरात असलेले मोबाईल अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये, दोन मोटार सायकल किंमत अंदाजे एक लाख 15 हजार रुपये असा एकूण जवळपास एक लाख 42 हजार 890 रुपयांचा एवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.
