कोरोनाला रोखण्यासाठी किल्लारी पोलीस आपल्या दारी; नागरिकांना मोफत मास्कचे वाटप
किल्लारी पोलीस, लामजना ग्रामपंचायत व अँटी कोरोना फोर्स यांची ध्वनिक्षेपका द्वारे जनजागृती मोहीम
औसा (प्रशांत नेटके) : औसा तालुक्यातील लामजना येथील कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत नियमावली तयार केली आहे. त्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा या पार्श्वभूमीवर किल्लारी पोलीस स्टेशन, लामजना ग्रामपंचायत, आणि अँटी कोरोना फोर्स लामजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ एप्रिल रोजी औसा तालुक्यातील लामजना येथे कोरोना जनजागृती मोहीम राबविण्यात आली.या मोहिमे अंतर्गत ‘पोलीस मास्कसह आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून लामजना येथील नागरिकांना घरोघरी जाऊन मास्क वाटप करण्यात आले.
कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी किल्लारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी लामजना गावांतील नागरिकांना मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी नागरिकांना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे, वारंवार हात धुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे याचे महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे, लामजना बिट जमादार सचिन उस्तुर्गे, लामजना सरपंच खंडेराव फुलारी, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य नजीर पटेल, महेश सगर, राम पवार, राम कांबळे, अँटी कोरोना फोर्स चे मार्गदर्शक महेश बनसोडे, उमेश शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी हणमंत कांबळे, युनूस कारभारी, सिद्धेश्वर चिल्ले, फराज कारभारी, दीपक राठोड, संजय फुलारी, वैभव बालकुंदे, जीवन जाधव आदी सर्व जण उपस्थित होते.