सामाजिक बांधिलकी जपत संचारबंदी चे नियम पाळा – भारत राठोड

सामाजिक बांधिलकी जपत संचारबंदी चे नियम पाळा - भारत राठोड

उदगीर (एल. पी. उगिले) : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि विकेंड लॉक डाऊन सुरू केला आहे. या अनुषंगाने शासन आणि प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांसाठी नियमावली बनवली असून आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाचे, त्याच्या कुटुंबीयांचे आणि पर्यायाने समाजाचे हीत होईल, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढीची साखळी तुटेल. असे आवाहन उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून दिवसेंदिवस प्रमाणही वाढत आहे आणि मृत्यूचे हे प्रमाण वाढत आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन जनतेच्या हिताचा विचार करून केवळ नाईलाज म्हणून संचारबंदी आणि निर्बंध लादले गेले आहेत. आपल्या भागात कायम लॉक डाऊन लागू होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने अत्यंत सजगपणे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वागावे. जेणेकरून स्वतःच्या व समाजाच्या आरोग्याचे रक्षण होईल. प्रशासनालाही कठोर पावले उचलण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

 मास्क चा वापर नियमित करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शारीरिक अंतर ठेवून वागावे, नियमित हात धुवत राहावे, सॅनिटायझर चा वापर नियमित करावा. असेही आवाहन भारत राठोड यांनी केले आहे. सध्या काही भागात बेडची संख्या कमी पडत असल्यामुळे होम क्वारंटाईन केले जात आहे. होम कोरंटाइन झालेल्या लोकांनी 14 ते 17 दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात येऊ नये.

 वास्तविक पाहता सात आठ दिवसात त्या लोकांना आराम वाटू लागला तर ते पॉझिटिव पेशंट लगेच बाहेर फिरू लागले आहेत अशी चर्चा आहे. हे अत्यंत चुकीचे असून कोरोनाचा पॉझिटिव पेशंट 12 ते 14 दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवू शकतो. याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मी आता बारा आहे, मला काहीच त्रास नाही, माझ्यात कोणतीच लक्षणे नाहित, मला दम लागत नाही अशी कारणे सांगून पाच-सात दिवसातच घराबाहेर पडून सुपर स्प्रेडरची भूमिका बजावू नये. शासनाच्या सूचनांचे पालन करून होम क्वारंटाईन झालेल्या लोकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

 सुपर स्प्रेडर स्वतःच्यासाठी व परिवारासाठी ही घातक आहे तसेच ही गोष्ट समाजासाठी घातक आहे. याचे गांभीर्य ओळखून सामाजिक जबाबदारी म्हणून प्रशासनाला मदत करावी. असेही आवाहन याप्रसंगी भारत राठोड यांनी केले आहे. कोरोना च्या संदर्भात कोणत्याही अफवा पसरवू नयेत. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. या लसीचा संदर्भात कोणतीही भिती बाळगू नये. सध्या संचारबंदी लागू असल्याने सर्व नागरिकांनी दक्षता बाळगावी. केवळ  जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांसाठी काही सुविधा दिले आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तू चा बहाणा करून विनाकारण रस्त्यावर कोणीही फिरू नये. सामाजिक बांधिलकी म्हणून नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांना अशा विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. याचे गांभीर्य बाळगून प्रशासनाला साथ द्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. असेही आवाहन मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे.

About The Author