ग्रामीण पोलिसांची देशी दारू विक्रेत्यावर धाड
उदगीर (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये रात्रीची संचारबंदी रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत लागू केली आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था तसेच जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन या अनुषंगाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक नामदेव सारूळे, पो का राहुल गायकवाड, दयानंद सूर्यवंशी असे रात्रीची गस्त घालत असताना गुप्त बातमीदारा मार्फत त्यांना समजले की, उदगीर तालुक्यातील हेर येथील वाघोबा चौकात पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास एका लाल रंगाच्या कारमध्ये देशी दारूचा चोरटा विक्री व्यवसाय होत आहे. ही खात्रीशीर बातमी मिळाल्याबरोबर या पथकाने हेर येथील वाघोबा चौकात 06:20 वाजता छापा मारला असता त्याठिकाणी एक लाल रंगाची कार क्रमांक एम एच 02 बी डी 87 42 गाडी मिळून आली. त्या गाडीमध्ये एक इसम आणि देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीचे 15 बॉक्स मिळून आले. सदरील बॉक्सच्या आत भिंगरी संत्रा असे कागदी लेबल असलेल्या 180 एम एल च्या 720 बाटल्या आढळून आल्या. लाल रंगाची होंडाई कंपनीची गाडी देशी दारूच्या बाटल्या असा एकूण एक लाख 83 हजार दोनशे रुपयाचा माल वीनापास परवाना चोरटी विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगून कारमध्ये ठेवून तिचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगलेला आढळून आला. सदर आरोपीने कोरोनाविषाणू साथरोग चालू असतांना जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला डावलून व सावधगिरीच्या नियमाचे पालन न करता उल्लंघन करत असताना मिळून आला म्हणून आरोपी रमेश उर्फ छोटू ज्ञानोबा मस्के याच्याविरुद्ध नामदेव रंगराव सारूळे पोलीस नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे प्रो गुरन 142 /21 कलम 65 (अ) (इ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा याच्यासह कलम 188 भारतीय दंड विधान संहिता आणि कलम 2, 3, 4 साथ रोग प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक घोडके हे करत आहेत.