संचारबंदीची विवाह सोहळ्यांना झळ
आनंदावर विरजण :मुहूर्त असूनही परिस्थितीपुढे सारेच हतबल
लातूर/औसा (प्रशांत नेटके) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने, राज्य शासनाने ३० एप्रिल पर्यंत ब्रेक द चैन अंतर्गत कडक नियमावली संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचा विवाह सोहळ्यानांही फटका बसला आहे. अनेक धुमधडाक्यात साखरपुडे साजरे केले, त्यानंतर लग्नसोहळ्याचे वेध लागले. मात्र संचारबंदी लागू झाली अन वधू वर पक्षांसह सर्वांचा हिरमोड झाला.
कोरोनाचा कहर कधी थांबेल, याचा भरवसा नसल्यामुळे १ मे नंतर शासकीय नियम पाळून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कर्तव्य उरकण्याचे विचार वधू वरांकडील पालक मंडळी करत आहेत. यामध्ये लॉकडाऊन मुळे लग्नसोहळ्यामधील अनावश्यक खर्च वाचत असल्याचा काहींचा आनंद असला तरी काही धनदांडग्या लोकांना मात्र लॉक डाऊन मुळे शाही विवाह सोहळ्यातील डामडौल करता येणार नाही, याचे दुख होत आहे. एप्रिल महिन्यात लग्नाच्या अनेक तारखा आहेत, परंतु या तारखा सारख्या पुढे ढकलल्या जात आहेत, तर काही जण परिस्थितीनुसार समारंभ उरकण्याच्या तयारीला लागले आहेत.
पूरक उद्योगांना लॉकडाऊनचा फटका
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नातेवाईक आमंत्रण देऊनही लग्नसोहळ्याला उपस्थित राहतील की नाही याची शाश्वती धरता येत नाही. तसेच लग्नसोहळ्यावर अवलंबून असलेली मंगलकार्यालये, केटरिंग, भांडी, कपडे, वाजंत्री, मंडप व्यावसायिक, फेटे व्यावसायिक, स्वयंपाक करणाऱ्या महिला, आचारी, छायाचित्रकार, घोडेवाले, बँडवाले या अशा एक ना अनेक पूरक उद्योगांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे.