खेडेगावात किराणा मालाची चढ्या दराने विक्री

खेडेगावात किराणा मालाची चढ्या दराने विक्री

संकटकाळातही किराणा दुकानदार सोडेनात कमाईची संधी; लॉकडाऊनच्या नावावर सर्वसामान्यांची होतेय लूट

औसा (प्रशांत नेटके) : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, त्यानुसार नागरिक देखील किराणा भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याचे कारण सांगून किराणा दुकानदार चढ्या दराने किराणा मालाची विक्री करू लागले आहेत. त्यामुळे आता चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य माणसांकडून जोर धरू लागली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना एकाच ठिकाणी गर्दी करू नका, आपल्या भागामध्ये असणाऱ्या या दुकानदारांकडून वस्तूची खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. कोरोना रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा तो एक भाग असून योग्यदेखील आहे. मात्र या संधीचा फायदा घेत आता काही दुकानदार चढ्या दराने किराणा मालाची विक्री करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांपूर्वी नियंत्रणात असणारे किराणा साहित्य, आवश्यक खाद्यपदार्थ, यांचे दर गगनाला भिडू लागले आहेत.
कोणतेही खाद्यपदार्थ, फळे घ्या दुप्पट भावाने विकली जात आहेत.दर कमी करायला विक्रेत्यास सांगितल्यास परवडत नसेल तर घेऊ नका, अशी उत्तरे दिली जात आहेत. काही किरकोळ दुकानदार दुकानदार किराणा मालाचे दर वाढवू लागले आहेत. घाऊक व्यापाऱ्याकडून दर वाढवले जात असल्यामुळे आम्हाला देखील दर वाढवावे लागत असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे मत आहे.

वास्तविक संचारबंदी मुळे कोणत्याही किराणा मालाचा भाव वाढलेला नाही. लॉकडाऊन मुळे आता जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना नागरिकांना आर्थिक फटका बसू लागला असून जादा दराने जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्याच्या पुरवठा विभागाला कधी जाग येईल अन अशा लुटारू दुकानदारांवर काय कारवाई करेल याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

असे आहेत किराणा मालाचे भाव

साखर – 38 रुपये
गूळ – 40 रुपये
शेंगदाणे – 110 रुपये
तेल – 150 रुपये
हरभरा दाळ – 70 रुपये
तूर दाळ – 110 रुपये
मूग दाळ – 110 रुपये
शाबुदाना – 70 रुपये
पोहे – 40 रुपये
तेल पाकीट – 145 रुपये
खोबर -200 रुपये
तेल डब्बा – 2320 रुपये

About The Author