देवणीकर यांच्या धरणे आंदोलनाला यश- संबंधितांना नोटीस
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील खानका गल्लीमधील शेख लाईक शेख अकबर यांनी बेकायदेशीर व विनापरवाना बांधकाम करून त्या जागेत बेकायदेशीरपणे बेकरी चा कारखाना सुरु केल्या संदर्भात व हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे म्हणून अब्दुल मुक्तदीर अब्दुल मुनाफ देवणीकर यांनी नगरपालिका प्रशासनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सदरील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात उदगीरच्या उपमुख्यधिकाऱ्यांना विनंती केली असता, त्यांनी देवणीकर यांच्याकडे बक्षिसाची अर्थात लाचेची मागणी केल्याची तक्रारही सदरील निवेदनात देवणीकर यांनी केली आहे. तसेच या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ काढून टाकण्यात यावे. ज्यामुळे या कारखान्यातून वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण होत असून परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे नागरिकांच्या, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले त्यांच्या आरोग्यावर भीषण दुष्परिणाम होत असल्याचेही सदरील निवेदनात नमूद केले आहे. तसेच या कारखान्याच्या प्रदूषणामुळे आजूबाजूला असलेल्या जुन्या घरांना तडे जात असून ध्वनी प्रदूषणामुळे कानावर व र्हदयावर विपरीत परिणाम होत असल्याचे ही नमूद केले आहे. तसेच या कारखान्यातून जे दूषित पाणी बाहेर सोडले जाते ते समोरच्या खड्ड्यात साचत असल्यामुळे रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. असेही सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नागरिकांची सनद (सुधारित) 2004 शासन निर्णयाप्रमाणे पृष्ट क्रमांक 28 परिशिष्ट 64 तसेच नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2016 अन्वये नगर परिषद यांनी कारवाई करणे अनिवार्य आहे. असे असतांना देखील संबंधितावर कारवाई न करता नगरपालिकेचे कर्मचारी या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही सदरील निवेदनात करण्यात आला होता. तसेच अन्न व भेसळ कार्यालयास पत्र काढून उपमुख्य अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचाही आरोप सदरील निवेदनामध्ये करण्यात आला आहे. या संदर्भाने मुख्याधिकारी भारत राठोड यांनी सदरील तक्रारीची दखल घेऊन संबंधितास नोटिसा देऊन खुलासा मागवला आहे.