रेणापुर पोलीसांची जबरदस्त कामगिरी !! जबरी चोरी करणाऱ्यांना जेलची वारी !!!
लातूर ( एल.पी.उगीले ) : लातूर जिल्ह्यातील रेनापुर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीकडून चोरट्यांनी जबरी चोरी करून वीस हजार रुपये रोख व सॅमसंग कंपनीचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेऊन चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी रेनापुर पोलीस स्टेशन येथे रविकांत तुकाराम चव्हाण यांनी फिर्याद दिली की, दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एम एच 24 बीएफ 1991 पल्सर या वाहनावरून लातूरहून मेन रोडने रेनापुर कडे जात असताना महापूर पुलाच्या पुढे अनोळखी इसमाने पाठलाग करून मोटर सायकल आडवी लावून गाडी थांबवली. तू बाईचे मंगळसूत्र, पैसे चोरले आहेस. ते परत दे. असे म्हणून त्यांच्याजवळ जाऊन मोटार सायकलची चावी काढून घेतली. व त्या चौघांपैकी एकाने कटरने मारून त्यास जखमी केले.
त्यास रोडच्या बाजूला नाल्यात ढकलून दिले. तेव्हा सर्वजण नाल्यात उतरून फिर्यादी जवळील रोख रक्कम वीस हजार, सॅमसंग कंपनीचा मोबाइल काढून घेतले. अशा पद्धतीच्या फिर्यादीवरून रेनापुर पोलीस स्टेशन येथे गुरनं 171/21 कलम 394, 34 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास कामी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सौ के एस निर्मळ, सपोनि एस बी माचेवाड, पोहेका कांबळे, पो ना उत्तम घाडगे, धर्मवीर शिंदे, संतोष गायकवाड, अभिजीत थोरात यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला.गुन्हे करण्याच्या पद्धतीचा आढावा घेत अधिक माहिती घेतली, दिनांक 28 एप्रिल रोजी गुन्ह्यातील सराईत चार आरोपी या विशेष तपास पथकाला निष्पन्न झाले.
सदरील गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल, वापरलेले हत्यार व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जी औसा येथून चोरलेली! निष्पन्न करून जप्त केली आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर या तपास पथकाने अवघ्या 48 तासाच्या आत उघड करून जबरी चोरी करणाऱ्यांना जेलची हवा दाखवली आहे. रेणापूर पोलिसांच्या या विशेष पथकाने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.