परिपूर्ण ज्ञानासाठी चाकोरी बाहेरचे शिक्षण गरजेचे – डॉ. संजय चाकणे
उदगीर (एल.पी.उगीले) : शिक्षण हे व्यक्तीच्या सुप्त क्षमतांचा विकास करणारे आणि माणुसकी निर्माण करणारे असले पाहिजे. अभ्यासाबरोबर अभ्यासपूरक, अभ्यासेत्तर आणि इतर गोष्टींचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. जेंव्हा विद्यार्थी त्यांची संस्कृती, भाषा आणि परंपरा यांच्याशी जोडले जातील,तेव्हा ते शिक्षण प्रभावी ठरते.केवळ शाळा कॉलेजच्या बंदिस्त भिंतीतून परिपूर्ण शिक्षण मिळत नाही, तर ते आपल्या रोजच्या जगण्यातूनही मिळते. म्हणुनच परिपूर्ण ज्ञानासाठी चाकोरी बाहेरचे शिक्षण गरजेचे आहे. असे मत डॉ. संजय चाकणे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी नियमितपणे घेतल्या जात असलेल्या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या 288 व्या वाचक संवादाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रसिद्ध साहित्यिक तथा टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे लिखित चाकोरी बाहेरचे शिक्षण या साहित्यकृतीवर बोलताना पुढे म्हणाले की, मुलांचे अनुभव विश्व जेवढे वाढेल, त्यातून खऱ्या अर्थाने त्यांचा विकास होईल. नवनिर्मिती आणि सृजनशीलतेचा आनंद देणे हेच खरे शिक्षण. आपली माती आणि आपली संस्कृती व परंपरा यांचे महत्त्व त्यांना समजले पाहिजे. बाह्यशिक्षणाशी कृती, स्वयंस्फूर्ती आणि स्मृतीच्या संस्कृतीला जोपासणारे सण, उत्सव, मूल्यांची रुजवणूक आणि जोपासना यांची जोड दिल्यास त्यांच्यावर अलिखित संस्कार होतात. चिंतनातून आलेले विचार अभिव्यक्त करताना परिवर्तन झाले पाहिजे.
यावेळी झालेल्या चर्चेत मुरलीधर जाधव, अर्चना पैके, मोहन निडवंचे,दीपक बलसुरकर, तुळशीदास बिरादार यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. यानंतर उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. अध्यक्षीय समारोपात परमेश्वर कदम म्हणाले की, शिक्षण हे आनंददायी होऊन ते रोजच्या जगण्यातून घेता आले पाहिजे. विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व जेवढे वाढेल तेवढेच त्यातून त्यांना शिकता येईल. माती आणि संस्कृती व परंपरा यांचे महत्त्व समजले पाहिजे तरच ते खरे शिक्षण म्हणता येईल.कार्यक्रमाचे संचलन प्रा. बालाजी सुर्यवंशी यांनी केले तर आभार संयोजक अनंत कदम यांनी मानले.