दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचे संरक्षण करणे गरजेचे – बालासाहेब शिंदे
उदगीर (प्रतिनिधी) : वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण धोक्यात आले आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या माध्यमातून वन्य प्राण्यांचे संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे महत्त्वाचे आहे.असे मत प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र तथा पर्यावरणप्रेमी बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी व्यक्त केले. अतनुरात प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र, प्राणीप्रेमी कार्यकर्ता वन्यजीव संरक्षण कायदा, प्राणी कायदा, प्राणीसंवर्धक कायदयाविषयक अधिवासासह वन्यजीवांना चांगले संरक्षण प्रदान करण्यासाठी महत्वपुर्ण अधिवास माहिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले की, जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघांचे संरक्षण होणे गरजेचे असते. तसेच वनसंपदेमुळे सर्व प्राणिमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सीजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. त्यामुळे जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी पोषक वातावरण तयार करून, त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र, प्राणीप्रेमी व वन विभागाने कार्य करावे. सध्या मोठमोठय़ा वनक्षेत्रांमध्ये वन्य प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता वन्य प्रेमींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतात आधी मुबलक असलेल्या वन्यजीवांचे नामशेष होणे अधोरेखित झाल्याने राष्ट्रीय पातळीवर वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे,असे सांगितले.
या बैठकीस १५ प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र, प्राणीप्रेमीसह प्राचार्य व्ही.एस.कणसे, प्रा.अविनाश पाटील, भागवत धुमाळ, प्रविण सोमवंशी, भीमराव बिराजदार, शिलरत्न गायकवाड, व्यंकटेश शिंदे, तानाजी सोमुसे, अविनाश शिंदे, कैलास सोमुसे-पाटील, श्रीकांत बोडेवार, संदीप नाईकवाडे उपस्थित होते.