राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा पाया रोवला – प्राचार्य चोबळे

राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा पाया रोवला - प्राचार्य चोबळे

उदगीर (एल. पी. उगीले) : पुरोगामी महाराष्ट्रामध्ये समता, बंधुतेचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रोवला. महाराष्ट्रामध्ये शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा, संस्कृती या सर्व गोष्टींचा विकास झाला पाहिजे. अशी तळमळ ठेवून सामाजिक जाणीव जपणारा जाणता राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रामध्ये समता प्रस्थापित व्हावी. यासाठी तत्कालीन समाज व्यवस्थेचे परंपरा आणि चालीरीतीचे बंधने याला तिलांजली देऊन सर्वांना सोबत घेऊन जाण्याची तयारी त्यांनी दाखवून समाजातील सर्वांनाच शिक्षण घेता आले पाहिजे. ही त्यांची तळमळ महाराष्ट्राला प्रगतीची दिशा दाखवणारी होती. असे विचार शामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद चोबळे यांनी व्यक्त केले. ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक संजय देबडवार, पत्रकार रामबिलास नावंदर यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे पत्रकार रामबिलास नावंदर यांनी याप्रसंगी बोलताना शाहू महाराजांच्या विविध लोककल्याणकारी भूमिकांचा गौरव केला. विशेष करून शाहू महाराजांची शिक्षणाबद्दलची तळमळ आणि समाजातील सर्व स्तरातील मुला मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी जागोजागी शिक्षण संस्था आणि गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह निर्माण केले. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून प्राथमिक शिक्षण सर्वांनी घेतलेच पाहिजे, असा अट्टाहास ठेवला. त्यामुळे शिक्षणाला महाराष्ट्रामध्ये गती येऊ शकली असे सांगितले.

पुढे बोलताना प्राचार्य चोबळे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीचा संकल्प करून सामाजिक जाणीव आणि ऋणानुबंध जपण्याची प्रतिज्ञा घ्यावी. आपण या समाजाचे काही देणे लागतो. ही भावना आपल्यामध्ये रुजवावी. तसेच शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रित राहून अध्यापन करावे. जेणेकरून या देशाचे उद्याचे भवितव्य सर्वगुण संपन्न निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांची पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थक करायचे असेल तर या गोष्टीची जाण सर्वांनी ठेवावी, असे सांगितले.

याप्रसंगी शाळेतील गुणवंत विद्यार्थी विश्वनाथे आकांक्षा महादेव, सोनटक्के बाजीराव, बिरादार शुभांगी, किने गायत्री, भदाडे अश्विनी यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या अठरा विद्यार्थ्यांचे अभिनंदन मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत सूर्यवंशी यांनी केले. महाराष्ट्राची चौफेर प्रगती व्हावी, मुदती हेतूने राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा रोडगे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शेख सईद, हाके नामदेव, बालाजी सोनाळे, बसवराज स्वामी यांनी सहकार्य केले.

About The Author