श्री हावगीस्वामीच्या इनडोअरमध्ये बॅडमिंटन कोर्टचा प्रारंभ
उदगीर (एल.पी.उगीले) : श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील समतानगर येथील मैदानात विद्यापीठ अनुदान आयोग व संस्थेच्या वतीने भव्य अशा इनडोअर स्टेडियमचे बांधकाम करण्यात आले आहे. या इनडोअर स्टेडियममध्ये हॉलीबॉल, बास्केटबॉल ,खो-खो, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन इत्यादी अनेक खेळ खेळता येतील. तशाप्रकारे मैदानाची आखणी करण्यात आली आहे.
सदरील स्टेडियममध्ये नुकतेच बॅडमिंटन कोर्टचा प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत लिबरल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव उमेश पाटील देवणीकर , नायब तहसीलदार संतोष गुट्टे, संस्थेचे उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे , संस्थेचे सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, माजी उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले, मनोज पुदाले,गणेश गायकवाड , महाराष्ट्र कापूस पणन महासंघाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले , संस्थेचे सदस्य गिरीष पाटील, रवी हसरगुंडे,अजय डोणगावकर , ॲड.दत्ता पाटील,ॲड.बालाजी पाटील, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर,उपप्राचार्य डॉ. आप्पाराव काळगापुरे मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले , हे इनडोअर स्टेडियम उभे करण्यासाठी संस्थेने तन-मन,धनासह पुढाकार घेतला. याचा लाभ गावातील सर्व खेळाडू व विद्यार्थ्यांनी घ्यावा, भविष्यात अनेक सुविधा संस्थेच्या पुढाकाराने उपलब्ध करून देण्यात येतील. यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सचिव उमेश पाटील देवणीकर म्हणाले, खेळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मोबाईलमुळे मैदान खेळ कमी होत आहेत.निरोगी जीवनासाठी या स्टेडियमचा फायदा नागरिकांनी घ्यावा. तसेच खेळा पासून कोणताही खेळाडू वंचित राहू नये, याची काळजी संयोजकांनी घ्यावी.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नायब तहसीलदार संतोष गुट्टे म्हणाले की, अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांसाठी खेळ देखील तितकेच महत्त्वाचे आहे.आज कौटुंबिक व आर्थिक जबाबदारीकडे अधिक लक्ष आपण देत आहोत.ते तर आपण केलेच पाहिजे. परंतु यामुळे खेळाकडे दुर्लक्ष होऊ नये.खेळाच्या माध्यमातून आजाराची तीव्रता कमी होते.खेळामुळे आपापल्या क्षेत्रात कार्य करताना उत्साह निर्माण होतो. खेळामुळे मानसिक आरोग्य सुदृढ राहते.
या इनडोअर स्टेडियममधून राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बॅडमिंटन प्रशिक्षक अमित सिद्धेश्वरे, डॉ.राजेश्वर पाटील, कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत धनुरे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमास गावातील नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.म.ई.तंगावार यांनी मानले.