सांगवी मन्याड नदीच्या पुलावर वाहनधारकांना अडवून लुटमार

सांगवी मन्याड नदीच्या पुलावर वाहनधारकांना अडवून लुटमार

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील सांगवी सुनेगाव येथील मन्याड नदीच्या पुलावर वाहनधारकांना अडवून लूटमार करण्यात आल्याची घटना दि.९ रोजी पहाटे एकच्या दरम्यान घडली असून, यात एका पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करून लूटमार केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेले मारुती मधुकर सुरनर (44 वय ) हे 7 मे रोजी सुट्टी काढून आपल्या मुलीच्या नीटच्या परीक्षा संदर्भात गावाकडे आले होते. मुलीची परीक्षा औसा येथे असल्याने ते आपल्या मूळ गावी सुनेगाव (ता.अहमदपूर) येथे मुक्कामी आले.मारुती सुरनर आपले मित्र सुनील जनार्दन बलांडे रा.सांगवी (ता.अहमदपूर) यांच्यासोबत 8 मे रोजी रात्री साडेदहा वाजता गावाजवळील एका धाब्यावर जेवण करून गाडीने परत जात असताना अहमदपूर पासून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुनेगाव सांगवी जवळील मन्याड नदीच्या पुलावर दिनांक 09.05.2023 रोजी 00.50 वाजता एक टिप्पर थांबलेला दिसला. त्या टिप्पर समोर स्विफ्ट डिझायर कार व दोन मोटरसायकल आडव्या लावलेल्या व त्याच्या समोर सहा ते सात अनोळखी इसम एकास मारहाण करताना दिसले, त्याच वेळी सुरनर व बलांडे यांनाही त्या सात ते आठ जणांच्या गटाने गाडी थांबवायला लावली व लाठ्या व लोखंडी सळईने मारहाण करीत बलांडे यांच्याकडील 24 हजार 500 रक्कम काढून घेतली. या दोघांनी आरडाओरोड केल्यामुळे मारहाण करणारे पळून गेले. याप्रकरणी सात अज्ञात व्यक्ती विरोधात अहमदपूर पोलिसात गुरन नं 271/2023 कलम 395,397भा. द.वी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून तातेराव बळीराम गवते रा. पेनुर ता लोहा हा.मु. हनुमान टेकडी अहमदपूर या आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड करीत आहेत.

About The Author