शेतकऱ्यांची लुबाडणूक झाल्यास धिंड काढू – लक्ष्मण फुलारी
उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात बी- बियाणे विक्रेते आणि खत विक्रेते यांच्याकडून शेतकऱ्यावर अन्याय झाल्यास त्यांची धिंड काढण्यात येईल. प्रशासनाने कृषी खात्याच्या अधिकाऱ्यामार्फत कृषी सेवा केंद्रावर लक्ष ठेवावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण फुलारी (भालके) यांनी केले आहे.
कृषी सेवा केंद्राकडे गेल्यावर्षीचा खताचा मोठा साठा शिल्लक असून तो शिल्लक असलेला खत जुन्या किंमतीमध्ये शेतकऱ्यांना विकला पाहिजे. असे असतांना अधिकाऱ्यांना हाताशी धरून कृषी सेवा केंद्राचे संचालक, मालक हे जुना साठा न दाखवता जुना खत नव्या भावात विकण्याची शक्यता आहे. त्याचीही गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना वेळेत बी- बियाणे पुरवठा केले जावीत. गेल्या वर्षी ज्या कंपन्यांनी बोगस आणि बनावट बियाणे विकून शेतकऱ्यांचे नुकसान केले, त्या कंपन्या वर बंदी घालून उगवण क्षमता असलेल्या बियाणांची विक्री बाजारात केली जाईल. याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. शासनाच्या वतीने शेती गटासाठी पुरवठा करण्यात येणारे साहित्य हे पेरणी झाल्यानंतर आल्याचे दाखवून काही साहित्य परत केले जाते तर काही काळ्याबाजारात जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्याकडून होत आहेत. अशा बाबी जर झाल्या तर संबंधित अधिकारी, कर्मचारी, कृषी सेवा केंद्राचे दुकानदार यांची धिंड काढून त्यांच्यावर कारवाई करायला भाग पाडू. असेही लक्ष्मण फुलाररी (भालके) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भाजपाचे लातूर जिल्हा अध्यक्ष आमदार रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी हितासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल. अशीही माहिती लक्ष्मण (भालके) फुलारी यांनी दिली आहे.