वृक्ष लागवड व संगोपन कार्यात नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा – शुभम क्यातमवार
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहर व परिसरा मध्ये माहे एप्रिल, मे या महिन्यामध्ये आपण प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करत आहोत, आपल्या शहर व परिसरातील तापमान ४० ते ४५ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. जमिनीचे होणारी धूप थांबवणे, पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरवणे या अनुषंगाने वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे.यासाठी उदगीर शहरातील नागरिकांनी, सामाजिक संस्था, विविध मंडळे, महिला बचतगट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आपण सर्वांनी हर घर नर्सरी या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. असे आवाहन उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी केले आहे.
हर घर नर्सरी या उपक्रमा अंतर्गत नागरिकांनी आपल्या घरआंगण/ परसबाग परिसरामध्ये किमान प्रत्येक कुटुंबीयांनी ५० रोपांची लागवड करून ते वाढवावी व येणाऱ्या जून मध्ये एक दोन पाऊस पडल्यानंतर त्या रोपांची लागवड आपल्या घर, अंगण, कॉलनी, सोसायटी, समाजमंदिर, शाळा, महाविद्यालय, खुले जागेत, रस्याच्या दुतर्फा या पैकी ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी त्याची लागवड करून त्याचे संगोपन करावे. हर घर नर्सरी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले उदगीर शहर स्वच्छ व सुंदरते, बरोबरच हरित उदगीर करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक, सामाजिक संस्था, विविध मंडळे, महिला बचतगट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी जे रोप लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी नगरपरिषदेच्या वृक्ष संगोपन विभागाशी संपर्क साधून त्यांना बियाणे, पिशव्या व माती उपलब्ध करून दिली जाईल. जेणेकरून नागरिकांना आपल्या घर अंगण परिसरामध्ये सदर रोपाची वाढ करणे व त्याची लागवड व संवर्धन करणे हे शक्य होईल. असेही आवाहन उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी केले आहे.