सूर्य आग ओकतोय , आरोग्याची काळजी घ्या – डॉ. तेलगाने
उदगीर (एल.पी.उगीले) : पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. गेल्या महिन्यापासूनच ग्रामीण भागात तापमान वाढताना दिसत आहे. सूर्य आग ओकतोय असे म्हटले जात आहे, कारण सर्वसाधारण पणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान तीन अंश सेल्सिअस जास्त असेल तर त्या भागामध्ये उष्माघाताची लाट आली असे म्हणतात. सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे प्रामुख्याने एप्रिल, मे, जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील कित्येक लोकांना आपल्या दैनंदिन कामासाठी उन्हातान्हात जावेच लागते, त्या लोकांनी विशेष करून काळजी घ्यावी. असे आवाहन सुप्रसिद्ध डॉक्टर तथा प्रबोधनात्मक किर्तनकार डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी केले आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये शक्यतो उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे, विशेष करून वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गरोदर महिला, स्थूल व्यक्ती, पुरेशी झोप न झालेले व्यक्ती, त्यासोबतच मधुमेह, हृदयविकार, दारूचे व्यसन असणारे लोक यांनी काळजी घ्यावी. विशेष करून घट्ट कपडे घातलेले लोक, घरदार नसलेले गरीब लोक, कारखान्यात बॉयलर जवळ काम करणारे लोक त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अशा लोकांचा प्रत्यक्ष उष्णतेची संबंध येतो. काही वेळेस वातावरणात तापमान दैनंदिन तापमाना प्रमाणेच दाखवले जाते, मात्र कित्येक वेळेस वातावरणातील आर्द्रताचे प्रमाण कमी झाल्याने उष्णतेची तीव्रता वाढते. त्यामुळे जास्त दक्षता घेणे गरजेचे आहे. तहान नसताना देखील पुरेसे पाणी प्या, शक्य असेल तर लिंबू पाणी घ्या. प्रवासामध्ये पाणी सोबत ठेवा, हलक्या रंगाचे शक्यतो पांढऱ्या रंगाचे सैल कपडे वापरा. उन्हात जाणे भागच असेल तर छत्री, डोक्यावर कपडा, टोपी वापरा. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा. शक्य असल्यास उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन क्रीम वापरा, किंवा कोरफडीचा गर लावा, सरबत किंवा जल संजीवनीचा वापर करा. उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस उन्हात कष्टाची कामे करू नका, शक्य असेल तर उन्हाची तीव्रता असताना घराबाहेर जाणे टाळा. लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनांमध्ये ठेवू नका. गडद रंगाचे कपडे वापरू नका, मद्यपान, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक टाळा. शिळे अन्न खाऊ नका.
जर एखाद्या वेळेस थकवा येणे, ताप येणे, शरीरावर व्रण उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता जाणवणे, जीभ कोरडी पडणे अशी लक्षणे दिसून येत असतील तर तात्काळ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्या. कारण हे उष्माघाताचे लक्षण असू शकतात. वातावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे मानवी शरीरावर असे परिणाम होतात, त्यामुळे दक्षता घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. असेही आवाहन डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी केले आहे.