अनुदानावर बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
देवणी (प्रतिनिधी) : खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना मिळणारी बियाणे, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली असून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत खरीप हंगामासाठी आवश्यक असणारी अन्नधान्य, तेलबिया आणि कडधान्य या बियाणा साठी शेतकऱ्यांनी महाडीबिटी संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन कृषि सहाय्यक श्री. पी. बी. कारभारी यांनी केले आहे.
कृषि विभागामार्फत “प्रमाणित बियाणे वितरण” आणि पिक “प्रात्यक्षिक बियाणे” या दोन घटकासाठी अर्ज स्विकारले जातात. यामध्ये “प्रमाणित बियाणे” या घटकासाठी शेतकऱ्याला कमाल ५०% मर्यादेपर्यंत आणि “पीक प्रात्यक्षिक’ या घटकासाठी शेतकऱ्याला १००% अनुदान दिले जाते. एका शेतकऱ्यास सोयाबीन,तूर, मुग, उडीद, मका, भुईमुग या पिकातील नवीन वाण आणि जुने वाण असे कमाल २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. अर्ज करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होईल.ऑनलाईन अर्ज करण्यास १३ मे पासून प्रारंभ झाला असून २५ मे पर्यंत दाखल करता येणार आहे. (बदल होऊ शकतो) तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणी करून बियाणे घटकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी सहाय्यक पी. बी. कारभारी यांनी केले आहे.