लामजना, तपसेचिंचोली परिसरात ऑनलाइन मटका जोरात, किल्लारी पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

लामजना, तपसेचिंचोली परिसरात ऑनलाइन मटका जोरात, किल्लारी पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

औसा (प्रशांत नेटके) : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करून अनेक निर्बंध घातले आहेत मात्र गेल्या काही महिन्यांपासून लामजना, तपसेचिंचोली परिसरात सुरू असलेले मटका अड्डे आता नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत वाढले आहेत. मोबाइलवरून बुकिंग घेण्यासह मटक्याची रक्कम थेट संबंधितांच्या हातात घरपोच देण्याची पद्धत वापरली जात आहे. जनता अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडले असावेत या विश्वासावर पोलीस यंत्रणा बेफिकीर राहत आहे मात्र यात परिसरातील अनेक लोक अत्यावश्यक सेवेच्या नावावर मद्यप्राशन ,ऑनलाइन मटका यासंबंधी घराबाहेर पडत आहेत.

औसा तालुक्यातील लामजना, तपसेचिंचोली परिसरात अनेक ठिकाणी भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम मटका अड्डे सुरू आहेत. परिसरात जुने मटका किंग पुन्हा सक्रिय झाले आहेत, त्यामुळे मटका अड्ड्यांना पोलिसांकडून अभय मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

किल्लारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका आणि जुगार खेळणाऱ्यांनी नवीन ठिकाणे तयार केली आहेत. पारंपरिक पद्धतीने ठराविक पानटपऱ्यांवर मटक्याचे बुकिंग घेणे सुरू होते, पण आता मोबाइल मटकाही सुरू आहे. मोबाइलवरून मटक्याचे आकडे लावण्याची सुविधा बुकींनी सुरू केली आहे. यासाठी मटका खेळणाऱ्या नेहमीच्या ग्राहकांना ठराविक मोबाइल नंबर दिले जात आहेत. मटका लागलेल्या व्यक्तीला मोबाइलवरूनच माहिती पुरवली जाते. विशेष म्हणजे मोठ्या रकमेसह खेळणाऱ्यांना बँकिंग सुविधाही पुरवली जात असल्याची चर्चा समोर येत आहेत. मटका खेळणाऱ्यांना रक्कम घेण्यासाठी जावे लागू नये, यासाठी बुकीकडे असलेल्या कार्यकर्त्यांच्या खात्यावरून मटक्याची रक्कम खेळणाऱ्यांच्या नावावर ऑनलाइन वर्ग केली जाते. या प्रकारामुळे लोकांच्या नजरेत न येताही मटका खेळता येत असल्याने तरुण आणि नोकरदार वर्गही मटक्याकडे आकर्षित होत आहे.

किल्लारी पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

राजरोसपणे सुरू असलेले मटका अड्डे पोलिसांना माहीत नसावेत हे आश्चर्यकारक आहे. किल्लारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लामजना, तपसेचिंचोली गावात फेरी मारल्यानंतरही मटका अड्ड्यांचे वास्तव लक्षात येते. कचऱ्याचे ढीग तपासले तरीही मटक्याच्या पाटीभर चिठ्ठ्या मिळतात. आत्मविश्वासाच्या आणि संपत्तीच्या जोरावर बुकी उघडपणे अड्डे सुरू करीत आहेत. यानंतरही पोलिसांच्या कारवाया केवळ कागदोपत्री होत राहतात हे विशेष.

About The Author