वेळेवर पाणी द्या ! अन्यथा पाणीपट्टी माफ करा;आमची माती आमची माणसं ग्रुपची मागणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) : सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस चालू असून शहरातील नागरिकांना न.प. मार्फत केला जाणारा पाणीपुरवठा हा ३० ते ३५ दिवसाला होत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे तात्काळ नियोजन करून तो सुरळीत करावा, अन्यथा अगाऊची पाणीपट्टी रद्द करावी, अशी मागणी शहरातील आमची माती आमची माणसं ग्रुपच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दि. १९ रोजी केली आहे.
अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना केवळ न. प. चे योग्य नियोजन नसल्यामुळे नागरिकांना ३० ते ३५ दिवसाला एकदा पाणी मिळत आहे. पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तसेच कडक उन्हाळा असल्यामुळे नळाला पाणी वेळेवर मिळत नसल्या कारणाने चढ्या दराने टँकरचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. वर्षातून केवळ दहा वेळेस पाणी देऊन भरमसाठ पाणीपट्टी वसुली केली जात आहे. तेंव्हा एक तर वेळेवर पाणी द्यावे, अन्यथा अगाऊची पाणीपट्टी रद्द करावी. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी ४४ कोटी ५८ लाख रुपये खर्च करूनही, धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ नगर पालिकेच्या अयोग्य नियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे. जर येत्या आठ-दहा दिवसात सुरळीत पाणीपुरवठा नाही केला तर, लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. निवेदनावर चंद्रशेखर भालेराव, दयानंद पाटील, प्रकाश बुलबुले, प्रा. डॉ. सय्यद अकबर, अनिकेत फुलारी, गोविंद काडवादे, सुनील स्वामी, बालाजी पारेकर, रवि मद्रेवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.