युवकांनी फक्त राजकारणच नाही तर समाजकारणाकडे वळावे – आ. धीरज देशमुख

युवकांनी फक्त राजकारणच नाही तर समाजकारणाकडे वळावे - आ. धीरज देशमुख

लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन
उदगीर (एल. पी. उगिले) : युवा पिढीने केवळ राजकारणच नाही तर समाजकारणामध्येही रस घ्यावा. विशेषतः लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचे नाव घेऊन जेव्हा युवक काँग्रेस काम करते, त्यावेळेस त्यांच्याकडून सामाजिक जाणीव जपत समाजकार्य ही केले जावे, अशी जनतेची अपेक्षा असते. त्या अपेक्षेला आपण खरे उतरू यात. तरुणांच्या विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन भविष्यात केले जाईल, त्या दृष्टीनेही नियोजन करून तशा सूचना कराव्यात. क्रिकेट लोकप्रिय खेळ असल्यामुळे आपण क्रिकेट पासून सुरूवात केलेली आहे, मात्र येणाऱ्या काळात इतर विविध स्पर्धा तालुका आणि जिल्हा पातळीवर घेण्याचे नियोजन करावे. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देऊन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या खेळाडूंचा खेळ युट्युब, व्हिडिओच्या माध्यमातून जगभर पोहोचवावा. जेणेकरून उत्कृष्ट खेळाडूंना योग्य ते तंत्रज्ञान वापरून ट्रेनिंग देता येईल. यासाठी आपण सदैव पुढाकार घेऊ, असे आश्वासन आ. धीरज देशमुख यांनी दिले.

गेल्या वेळच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये उदगीरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता त्यामुळे आता त्यांची जबाबदारी आणखीच वाढली आहे. जिल्हाभरातील खेळाडू उदगीरच्या संघाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. तसेच इतर तालुक्यातील अनेक संघ ही मोठ्या जिद्दीने विजय संपादन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे उदगीर करांची कसोटी आहे असेही सांगितले.

युवकांनी फक्त राजकारणच नाही तर समाजकारणाकडे वळावे - आ. धीरज देशमुख

ते उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मधुकर एकुर्केकर, सुभाष घोडके, सचिन दाताळ, कैलास पाटील, अनुप शेळके, मुकेश राजमाने, कमलाकर आनंदवाड, प्रशांत माने, शेषराव हाके पाटील, प्रमोद कापसे, राहुल गरड, प्रवीण माने, रमेश सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, संतोष बिरादार, नाना ढगे, जावेद शेख होणाळीकर, नंदकुमार पटणे, नागेश पटवारी, रवी पाटील कोळखेडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संयोजक तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे यांनी प्रास्ताविकातून या स्पर्धेच्या आयोजनाच्या संदर्भात माहिती दिली. केवळ आठ दिवसाचा वेळ असल्यामुळे आम्ही केवळ 52 संघांना सहभागी करू शकलो, भविष्यकाळात जास्त संघाना ही संधी देता येईल,असे सांगितले.

याप्रसंगी पुढे बोलताना आ. धीरज देशमुख यांनी सांगितले की, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समाजातील उत्कृष्ट खेळाडूंना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता खेळ देखील उत्पन्नाचे साधन बनू शकते, हे सिद्ध झाले आहे. केवळ निवडणूक आणि राजकारण हे युवकांचे मर्यादित क्षेत्र नसून आपल्या भागातील तरुणांना योग्य दिशा देणे, त्यांना सहकार्य करणे हे देखील आपले कार्य आहे, याची जाण ठेवावी. गरीब खेळाडूंना त्यांच्या पात्रतेनुसार तज्ञाकडून योग्य ट्रेनिंग दिली जाईल, त्यासाठी आपण प्रयत्न करू, ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य आणि देश पातळीवर खेळण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही याप्रसंगी आ. धीरज देशमुख यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा या लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेचे संयोजक विजय निटुरे यांनी आ. धीरज देशमुख यांना क्रिकेटची बॅट देऊन त्यांचे स्वागत आणि सत्कार केला.

या औपचारिक उद्घाटनाच्या नंतर लातूर ग्रामीण टीम चे कप्तान युवा नेते आ. धीरज देशमुख आणि व्ही आर एन ग्रुपचे कप्तान विजय निटुरे यांच्या संघामध्ये सामना झाला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात व्ही आर एन टीमने शेवटच्या षटकात विजय संपादन केला. उदगीर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आ. धीरज देशमुख यांचा उत्कृष्ट खेळ उदगीरकरांना पाहायला मिळाला. धीरज देशमुख हे अष्टपैलू खेळाडू असल्याचेही दिसून आले. उदगीरच्या क्रीडा रसिकांनी या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतला.

About The Author