जुगार अड्ड्यावर धाड, 32 हजाराचा मुद्देमाल जप्त, आठ आरोपीवर गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर धाड, 32 हजाराचा मुद्देमाल जप्त, आठ आरोपीवर गुन्हा दाखल

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरात आणि ग्रामीण भागात अवैध यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक हे वारंवार अवैध धंद्याच्या विरोधामध्ये मोहीम काढत असून देखील स्थानिक पोलिसांचे म्हणावे तसे गांभीर्य या बाबीकडे नसल्याने, शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार, मटका आणि महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे. या अवैध धंद्याच्या विरोधामध्ये प्रसिद्धी माध्यमंनी वारंवार बोंब मारून देखील गेंड्याची कातडी पांघरलेल्या स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काहीही फरक पडत नाही आहे. छोट्या छोट्या धंदेवाल्या वर कारवाई करून गुन्हे दाखल केल्याचे आकडे वाढवून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यामध्ये पटाईत असलेल्या पोलिसांनी थातूरमातूर कारवाईला प्राधान्य दिले आहे. वास्तविक पाहता अवैध धंदे जर थांबायचे असतील तर, मुळावर घाव घालने गरजेचे आहे. या अवैध धंद्याचे खरे मास्तर माईंड कोण आहेत? हे पोलिसांना माहीत असून देखील आपल्या चिरीमिरीच्या आशेने पोलीस गप्प असल्याची चर्चा खुलेआम चालू आहे.

नुकतेच उदगीर येथील नवा मोंढा परिसरातील आडत लाईनच्या भागात स्वतःच्या फायद्यासाठी बंद खोलीत अंदर बहार नावाचा जुगार आर्थिक फायद्यासाठी खेळत व खेळविला जात असताना, उदगीर शहर पोलिसांनी धाड टाकून बत्तीस हजाराचा रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार खेळणाऱ्या आठ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलिसात रुपेश बालाजी कज्जेवाड यांनी सरकार पक्षाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुजित सुधाकर फुलारी (वय 31 वर्ष रा. धब्बेपुरा उदगीर), संजय जवाहर बदलानी (वय 40 वर्ष रा. एसटी कॉलनी उदगीर), सुजित लक्ष्मण दामूवाले (वय 24 वर्षे रा. चांभार सोसायटी उदगीर), नागराज सूर्यकांत बिरादार (वय 34 वर्ष रा. माळेवाडी ता. उदगीर), रत्नदीप शिवाजी तपासे (वय 36 वर्ष रा. देवणी), प्रमोद प्रकाश देशमुख (वय चोवीस वर्षे रा. निडेबन, उदगीर), सुरेश चंद्रकांत आलमकेरे (वय 36 वर्ष रा. हनुमान कट्टा, उदगीर), गोविंद बाबुराव चव्हाण (वय 24 वर्षे रा. निडेबन) या आठ आरोपीविरुद्ध गु.र.न. 156 /23 कलम 4 व 5 मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास चव्हाण हे करत आहेत.

अशा अवैध धंद्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेतून होत आहे. जुगारामुळे कित्येक सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य बरबाद होत आहे, या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author