लॉकडाउनच्या च्या नावाखाली पोलिसांनीच आंबे विक्रेत्या महिलेची टोपली पळवली !!
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरात सध्या पोलीस प्रशासनाचे नवेनवे किस्से ऐकायला मिळत आहेत. गंमत म्हणजे लाॅकडाऊनच्या नावाखाली फळे, भाजी विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली असली तरीही, हातावर पोट असलेले गोरगरीब लपून छपून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका गरीब महिलेने उदरनिर्वाहासाठी आंबे विकायला सुरुवात केली. मात्र तिच्या दुर्दैवाने नांदेड रोडवर एका पोलिस अधिकाऱ्याला तिने झाकून ठेवलेले आंब्याचे कॅरेट दिसले. आणि त्या साहेबांनी लगेच ते आंब्याचे कॅरेट उचलून नेले! पोलिसांच्या या कर्तबगारीचा किस्सा शहरात हांहां म्हणता सर्वत्र पसरला. या किळसवाण्या आणि हिडीस प्रवृत्तीचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला.
त्या बिचाऱ्या महिलेने आपले झालेले नुकसान साश्रुनयनांनी समाजातील काही जाणकारांना सांगण्याचा प्रयत्न केला. सध्या आंब्याचे भाव वाढलेले असल्याने त्या महिलेने चार पैसे कमवावे, या उद्देशाने रस्त्याच्या कडेला थांबून आंबे विक्रीचा प्रयत्न केला. खरेतर अत्यंत कठोरपणे वागले तरीही थोडाफार दंड त्या महिलेला करायला हरकत नव्हती. मात्र चक्क तिची टोपलीच घेऊन पळून जाणे हे कितपत योग्य आहे? लहाण मुले चोर-पोलिस खेळतात,पण इथे पोलिसच चोरी करतांनाचा!चोरीच नव्हे चक्के दरोड्यासारखा प्रकार करत असतांनाचा प्रकार चर्चेत आल्याने सर्वजण हाक्काबक्का झाले आहेत!
अनेक गुन्हेगार ज्यांना सापडत नाहीत, अशा कर्तबगार पोलिसांना या महिलेचे कॅरेट मात्र सापडले! आणि त्यांनी ते लंपास केले!!
रक्षकच भक्षक होतात, तेव्हा दाद तरी कोणाकडे मागावी? असा प्रश्न त्या महिले समोर निर्माण झाला होता. मात्र या घटनेची माहिती काही पत्रकारांना झाल्यानंतर त्यांनी चौकशी केली, आणि जादूची कांडी फिरावी तसे कॅरेट आणि उरलेले काही आंबे संबंधित महिलेकडे सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या या कर्तबगारीचा गवगवा आता शहरात झाला आहे. वरिष्ठ पातळीवरून याची चौकशी होणे गरजेचे आहे. एकंदरीत पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचे पाप अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांकडून होत असेल तर त्यांना जाब विचारणे काळाची गरज आहे. मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? अशी अवस्था निर्माण झाली आहे. पोलीस राजरोसपणे पत्रकारांना धमकी देतात, जाब विचारणाऱ्याला उद्धटपणाने वागणूक देतात आणि सर्वसामान्य माणूस आपल्याला याचे काय देणेघेणे? म्हणून मुकाटपणे सर्व सहन करतात! पण हे किती दिवस? असाही प्रश्न लोकांना पडला आहे. पोलिसांनी आपली पातळी आणि लाज सोडली! अशी चर्चा आता शहरात राजरोस चालू आहे. संबंधित साहेबांमुळे कर्मचारी वर्गही वैतागला असल्याची पोलिसांमध्ये चर्चा आहे.