स्वावलंबी आणि सशक्त भारताच्या स्वप्नांची बीजे पेरणारे माझे गाव माझे तीर्थ – डॉ. मल्लिकार्जुन करजगी
उदगीर (प्रतिनिधी) : भारत हा खेड्यांचा देश आहे. खेडे सुधारली तरच देश सुधारेल. स्वच्छता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि भ्रष्टाचार निर्मूलन या गोष्टीसाठी नवतरुणांना प्रेरित केले तर प्रत्येक गाव स्वर्ग बनेल. देश सेवा करण्यासाठी सर्वांनाच सीमेवर जाण्याची आवश्यकता नाही, तर प्रत्येकाने आपल्या गावच्या विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या गावचा स्वयंपूर्ण विकास घडवून आणलेले राळेगणसिद्धी म्हणजे स्वावलंबी आणि सशक्त भारताच्या स्वप्नाची बीजे पेरणारे माझे गाव माझे तीर्थ होय. असे मत डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी व्यक्त केले.
शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद नवले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत च्या 289 व्या वाचक संवादात अण्णा हजारे लिखित माझे गाव माझे स्वर्ग या साहित्यकृतीवर प्रसिद्ध विचारवंत, वक्ते तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी संवाद साधला. थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वतःचे जीवन देशासाठी अर्पण करून घरदार सोडून यादव बाबाच्या मंदिरालाच आपलं घर समजून तिथून ग्राम स्वच्छता, व्यसनमुक्ती , दारूबंदी, गुटखाबंदी, परिवार नियोजन या सगळ्या बरोबरच श्रमदान या गोष्टीला महत्त्व देत प्रत्येक कुटुंबातून एक जण, आठवड्यातला एक दिवस गावासाठी द्यायचा. आणि श्रमदानातून गावाचा विकास घडवून आणायचा, हि योजना राबवली. शासकीय योजना जर आपल्यापर्यंत पोहोचत नसतील तर त्या खेचून आणायच्या यासाठी जर कोणी अधिकारी आड येत असेल तर त्याच्यासाठी उपोषणाचे हत्यार उभारायचे. याशिवाय नापास विद्यार्थ्यांसाठी नापासांची शाळा चालू करून गावाचा विकास घडवून आणला. आज आपल्या देशातलं एक आदर्श गाव म्हणून राळेगणसिद्धी हे गाव ओळखलं जाते. ज्या गावाला अण्णा हजारे माझे गाव, माझे तीर्थ असे संबोधतात. अशा या गावाबद्दल, गावाच्या विकासाबद्दल आणि एकंदरीत अण्णा हजारेंच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी साधलेला संवाद हा एवढा प्रभावी होता की श्रोत्यांना प्रत्यक्षात राळेगणसिद्धीतच आपण आलोत की काय? असा भास होत होता.
या संवादानंतर झालेल्या चर्चेत अर्चना पैके, मुरलीधर जाधव आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यानंतर उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना डॉ. नवले म्हणाले की, वाचक संवाद ही चळवळ समाजाच्या बुद्धीत भर घालणारी असून नवे विचार, नव्या प्रेरणा देणारी आहे. या कार्यक्रमाला डॉ. करजगी यांच्यासारखी विचारवंत माणसे येतात आणि प्रत्येकांना चांगले विचार देऊन जातात हे विशेष म्हणावे लागेल. असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात संवादकांचा परिचय प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी करून दिला कार्यक्रमाचे संचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य तथा शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल विष्णू पवार यांनी मानले.
.