कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवाजी हुडे तर उपसभापतीपदी प्रीती भोसले बिनविरोध
उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठित असलेली मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदगीरच्या बाजार समितीवर सभापती म्हणून दुसऱ्यांदा शिवाजीराव हनुमंतराव हुडे यांची तर उपसभापती पदी लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखरजी भोसले यांच्या सुकन्या प्रीती चंद्रशेखर भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रगतीमध्ये लोकनेते स्व. चंद्रशेखर भोसले यांचा सिंहाचा वाटा होता. शिवाजीराव हुडे यांच्या यापूर्वीच्या कार्यकाळात लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांच्या सल्ल्यानुसार अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या होत्या. त्यापैकी काही योजनावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप नोंदवले होते, परिणामतः त्या योजना स्थगित कराव्या लागल्या होत्या. मात्र पुन्हा शेतकरी, हमाल, मापाडी यांच्या हिताच्या योजना पूर्ववत राबवल्या जातील, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकायची या निर्धाराने शिवाजीराव हुडे यांनी भारतीय जनता पक्षातून स्वग्रही प्रवेश केला. त्यामुळे अनेक राजकीय गणिते बदलली गेली. तरीदेखील राजकारणातील सर्व नितींचा वापर केल्यामुळे काँग्रेसला 17 जागेवर विजय मिळवता आला, तर एक जागा भारतीय जनता पक्षाचे नेते भगवानराव पाटील तळेगावकर यांनी सर्वाधिक मतदान घेऊन मिळवली. नूतन सभापती शिवाजीराव हुडे आणि उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.