अहमदपूर कृउबा सभापतीपदी राष्ट्रवादीचे मंचकराव पाटील तर उपसभापतीपदी काँग्रेसचे संजय पवार
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील येथील नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 13 जागा तर तर भाजपा युतीच्या शेतकरी विकास पॅनल चा पाच जागेवर विजय मिळाला होता. आज दिनांक २३ मे रोजी कृउबा च्या सभागृहात पार पडलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी एम एस लटपटे यांच्या उपस्थितीमध्ये सभापती व उपसभापती पदांची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली असता यामध्ये सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंचकराव पाटील तर उपसभापती पदी काँग्रेसचे संजय पवार यांची प्रत्येकी १३ विरुद्ध पाच मताने निवड झाली आहे.
सभापती पदासाठी पॅनल प्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंचकराव पाटील यांचा तर उपसभापती पदासाठी काँग्रेस पक्षाचे संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजप युतीच्या वतीने सभापती पदासाठी जीवनकुमार मद्देवाड यांचा आणि उपसभापती पदासाठी अण्णासाहेब कांबळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि प सदस्य मंचकराव पाटील यांना सभापती पदासाठी तेरा मते प्राप्त झाली तर जीवनकुमार मद्देवाड यांना पाच मतांवर समाधान मानावे लागले. उपसभापती पदासाठी काँग्रेसचे संजय पवार यांना तेरा मते मिळाली तर भाजपा युतीचे अण्णासाहेब कांबळे यांना पाच मते पडली. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी लटपटे यांनी सभापती पदी राष्ट्रवादी चे मंचकराव पाटील यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसचे संजय पवार या दोघांची विजयी झाल्याची निवड घोषित करून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यावेळी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
————————-
सभापती व उपसभापती यांची निवड घोषित केल्यानंतर महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील मैदानावर मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सांबा महाजन हे होते. तर विचारपीठावर आमदार बाबासाहेब पाटील , नूतन सभापती मंचकराव पाटील उपसभापती संजय पवार, शिवानंद हेंगणे, शिवाजीराव देशमुख , शंकरराव गुट्टे साहेबराव जाधव ऍडव्होकेट हेमंतराव पाटील, विश्वंभर पाटील ,सौ ज्योतीताई पवार, विकास महाजन, निवृत्तीराव कांबळे ,माधराव जाधव , माधवराव पवार आदिं सह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे नूतन संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, आम्ही प्रचाराचे योग्य नियोजन करून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर जिंकलेली आहे.आम्ही येथे व्यापाऱ्यांना आधार देणार ,बाजार समितीमध्ये मोठे व चांगले रस्ते तयार करणार आहोत ,पारदर्शक व्यवहार , कॉम्प्यूटराईज्ड कामकाज , मार्केट कमिटीची सुंदर इमारत बांधणार , रस्ते मोठे व चांगले करणार ,संरक्षण भिंत बांधणार, शेतकरी विसावा ,संडास- मुतारीची सोय, महिलांसाठी बसण्याची चांगली व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी उपस्थितांसमोर दिले.
पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की या मतदारसंघाचे विकासासाठी ६०० ते ७०० कोटी रुपये विकास निधी हा खेचून आणला असून आम्ही लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे आहोत. आम्ही यावेळी सर्वांचे समाधान करू नाही जरी शकलो तरीही इतरांना निश्चितच सत्तेची फळे चाखायला देणार आहोत. यावेळी ते म्हणाले की मतदारांनी आम्हाला प्रचंड मतांनी विजयी केले असून आम्हीही यापुढे मतदारांना निराश करणार नसल्याचे अभिवचन यावेळी दिले.
पुढे बोलतेवेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की विरोधकांचा प्रचार हा मतदारांची दिशाभूल करणारा होता जे राज्यात चांगले आहे ते येथे आणणारच, याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला योग्य भाव कसा चांगला देता येईल याचाही विचार करणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी नूतन सभापती मंचकराव पाटील म्हणाले की आम्ही स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करून निश्चितच बाजार समितीमध्ये वैभव प्राप्त करून देणार आहोत.येथील व्यवहार जास्त वाढविणार असल्याचे म्हणाले.
याप्रसंगी तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी चोपणे तर आभार ओम उगिले यांनी मानले.