जनतेच्या सोईसाठी ‘शासन आपल्या दारी’ ही योजना प्रभावी – आ.संजय बनसोडे
उदगीर(एल.पी.उगीले) : शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ ही योजना प्रभावी ठरउन सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनेचा लाभ पोहोचणार असल्याचे मत माजी राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते राधे कृष्ण मंगल कार्यालयात आयोजीत ‘शासन आपल्या दारी’ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरात उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमास लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, आत्माचे संचालक एस.व्ही. लाडके, उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे, जळकोटच्या तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, गटशिक्षणाधिकारी शफीक शेख, रा.काॅ.चे शहराध्यक्ष समीर शेख, श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, प्रभाकर पाटील, विवेक मुसणे, मनोज पाटील, शुभम केंद्रे, डाॅ. दत्तात्रय पवार,डाॅ. प्रशांत कापसे, व्यंकटराव पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले, या ठिकाणी महसूल, आरोग्य, नगरपरिषद , पंचायत समिती, कृषी, मनरेगा, एकात्मिक बाल विकास, शिक्षण विभाग, जलसंधारण, वनविभाग, महावितरण, पशुसंवर्धन, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, कामगार विभागाची दालने येथे उभारण्यात आली असुन संबंधित विभागाने माहिती पत्रक काढून त्यांच्या खात्याच्या विविध उपक्रमांची माहिती प्रसिध्द केली आहे. ती माहिती नागरीकांनी घेवुन आपण सर्वांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
विविध योजनेचे लाभार्थी शासकीय कचेरीत खेटे मारत असल्याचे आढळल्याने शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला थेट लाभ मिळणार आहे. राज्याला सक्षम करायचे असेल तर शिक्षण विभागाला महत्व दिले पाहिजे. महिन्यातून एकदा तरी असे शिबीर घेवुन नागरीकांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. नागरिकांची सोय व्हावी,म्हणून आपल्या सर्वांच्या सोईसाठी सर्व प्रशासकीय इमारत व पंचायत समिती, तहसीलची इमारत बांधली असुन भविष्यात सर्वसामान्य नागरिकांची सोय होणार आहे. आपल्या मतदार संघात मागील ३ वर्षात दोन ते अडीच हजार कोटी रुपये शासनाकडुन खेचुन आणुन मतदार संघाचा कायापालट केला.जिल्ह्यात केवळ आपल्या मतदार संघात ६०० कोटी रुपयाची वाटरग्रीडची योजना आणली. त्यामुळे आपल्या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. मागील काळात विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना शासनाच्या योजना पोहचवल्या. मजुरांसाठी दुपारच्या मध्यान्ह भोजनासाठी मध्यान्ह भोजण्याच्या २५ गाड्या चालु केल्या.
शासनाची योजना आपल्या घरापर्यंत येवून लाभ देणे म्हणजेच शासन आपल्या दारी आले असे होते. एकाच छताखाली एकाच खिडकीत सर्व प्रकारच्या योजनाचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न असुन भविष्यात तो पुर्णात्वास जाईल. आज येथे २१ विविध विभागाचे स्टाॅल उभारले असुन प्रत्येक विभागाच्या १० लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी मानले.
यावेळी शासनांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित योजनांचे पात्र लाभार्थी, सर्व विभागाचे अधिकारी – कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.