रेल्वे स्थानकात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, महिलेचा विनयभंग करून लुबाडले
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय विचारात घेऊन रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे गेल्या दहा वर्षापासून रेल्वे पोलिसांच्या वाढीव संख्येच्या संदर्भात पत्रव्यवहार करत आहेत. आश्वासनांची खैरात या पलीकडे त्यांना काहीही हाती लागले नाही. काही दिवसांपूर्वी एका महिलेला लुबाडले गेले होते, त्यावेळेस ही आवाज उठवला गेला होता. मात्र त्याची दखल फारशी गांभीर्याने घेतली गेली नाही. त्याचा परिणाम म्हणूनच की काय? पुन्हा एका महिलेला लुबाडून तिचा विनयभंग केल्याची दुर्दैवी घटना उदगीर रेल्वे स्थानकात घडली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, उदगीरच्या विकासासोबतच रेल्वेची संख्याही वाढू लागली आहे. अनेक रेल्वे रात्रीच्या वेळी असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. उदगीर येथून हैदराबादला जाण्यासाठी आरक्षण करावे, म्हणून रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन तरुणी उदगीरच्या रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून जात असताना, दोन मोटरसायकल बनशेळकी रोडच्या बाजूने आल्या. त्यावर पाच ते सहा मुले होती. त्यापैकी एक सिल्वर रंगाची मोटर सायकल (क्रमांक एम एच 24 ए आर 49 40) ही त्या मुलींच्या जवळ आली,त्यावर दोन मुले होती. त्यातील मागे बसलेल्या एकाने तरुणीस “तू मुस्लिम होकर एक हिंदू लडके के साथ क्यू घूम रही हो? तुझे मौलानाने ये ही शिकाया हे क्या? असे बोलत फिर्यादीस, “एक हजार रुपये देता हु आती है क्या ? असे म्हणून मोटरसायकल आडवी केली. त्यावेळी फिर्यादीने त्यास जाब विचारताच, “तू चूप बैठ” असे म्हणून तिला गप्प केले. त्यावेळी फिर्यादी यांनी पतीला फोन करत असताना, “जा किसको बुलाती है, बुला” असे म्हणून कमरेचा बेल्ट काढून फिर्यादीस व सानिया शेखला मारहाण करण्यास सुरुवात केली. “ए पकड रे इस को, बिठा गाडी पे, मेरे पास बहुत पैसा है, इसको तो आज लेके जायेंगे” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच यांना दाखवलेच पाहिजे, अशा पद्धतीची धमकी दिली. अनेक दिवसापासून हिला मी पाहतोय. असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. दरम्यान समोरच्या ओव्हर ब्रिज वरून मुले खाली उतरत असलेले दिसताच, आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ज्याची अंदाजे किंमत 25 हजार रुपये आहे. ते तोडून पळून गेले. दरम्यान आडवी लावलेली मोटार सायकल घेऊन जाणे शक्य नसल्याने ती मोटरसायकल तेथेच पडून राहिली. थोड्या वेळात फिर्यादीचे पती येताच, उदगीर शहर पोलिसांना मदतीसाठी फोन केला, पोलीस आले आणि हा प्रकार रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याचे सांगितले. तेव्हा रेल्वे स्टेशन उदगीर येथील पोलीस चौकी येथे तक्रार दिल्यावरून आरोपीच्या विरुद्ध गु.र.न. 81/ 23 कलम 324, 354, 392, 506, 34 भारतीय दंड विधानसभेचे सह कलम 3 (1), (10),( 11) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीने केलेल्या तक्रारीतील वर्णनानुसार आणि घटनास्थळावर पडलेल्या मोटरसायकलचा तपशील प्राप्त करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी सिद्धीकी नजीमुद्दीन शेख (वय पंचवीस वर्षे, धंदा मजुरी रा. नांदेड नाका मंजूर मज्जिद जवळ उदगीर) आणि आसिफ खान रशीद खान पठाण (वय 27 वर्षे ,धंदा वेल्डर, रा. एसटी कॉलनी मलकापूर, उदगीर) या दोघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास चालू आहे.
या आणि अशा घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन उदगीर रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने विशेष दक्षता घेण्यात यावी, उदगीर हे शहर विकासाच्या दृष्टीने सतत वाढत असून अनेक रेल्वे सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या ही वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर उदगीर रेल्वे स्टेशन येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन दिले जावे. अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.