उत्कृष्ट तपासाबद्दल पोलीस नायक अजय भंडारे व ईश्वर बिरादार यांचा सत्कार
उदगीर (एल. पी. उगिले) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सन 2021 मध्ये सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु. र.न. 245 /21 कलम 302 भारतीय दंड विधानसंहिता प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपी सूर्यकांत काशिनाथ गताटे (वय 62 वर्ष राहणार देऊळवाडी तालुका उदगीर) यांच्या विरुद्ध कलम 299 सीआरपीसी प्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपी सप्टेंबर 2021 पासून फरार होता.
उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक अजय भंडारे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर बिरादार यांना या प्रकरणातील आरोपीच्या अटकेच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने गोपनीय बातमीदाराच्या मदतीने पाळत ठेवून आरोपी हा मजुरीच्या कामासाठी मोटरसायकल वरून कर्नाटकातील कमालनगर जिल्हा बिदर येथे जात असल्याचे समजताच, त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले, आणि संबंधित गुन्ह्याच्या बाबतीत अधिक तपासासाठी उदगीर ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांचे कौतुक करून उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान केला. कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप देऊन त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. अजय भंडारे आणि ईश्वर बिरादार या दोन्ही कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.