हत्तीबेटावर सेंट्रल नर्सरी उभारावी, व उर्वरित क्षेत्रावर वृक्षांची लागवड करावी. विकास समितीची मागणी

हत्तीबेटावर सेंट्रल नर्सरी उभारावी, व उर्वरित क्षेत्रावर वृक्षांची लागवड करावी. विकास समितीची मागणी

उदगीर : हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर कायमस्वरूपी पाण्याची सोय झाल्यामुळे या ठिकाणी वन विभागाचे सेंट्रल नर्सरी सुरू करून तेथील मजुरांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून द्यावा, व उर्वरित शिल्लक क्षेत्रावर याच वर्षी वृक्षांची लागवड करण्यात यावी. अशी मागणी हत्तीबेट विकास समितीच्या वतीने करण्यात आली.

उदगीर येथे शुक्रवारी ‘शासन आपल्या दारी’ अभियानात हत्तीबेट विकास समितीच्या वतीने सेंट्रल नर्सरी व उर्वरित शिल्लक क्षेत्रावर विविध प्रजातींच्या देशी वृक्षांची लागवड याच वर्षी पावसाळ्यात करण्याची मागणी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

या दोन्ही मागणीसाठी हत्तीबेट विकास समितीच्या पदाधिकारी व मजुरांनी धाराशिव येथे विभागीय वन विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १०दिवसात हत्तीबेटावर सेंट्रल नर्सरी सुरू करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. शिवाय शासनाच्या आदेशानुसार उर्वरित शिल्लक क्षेत्रावर नवीन वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र १५ फेब्रुवारी२०२३ रोजी उपोषणकर्त्यांना देण्यात आले होते. तीन महिने उलटून गेली तरी हत्तीबेटाची प्रगती ‘शून्य’असल्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी यांची शिष्टमंडळाने भेट घेवून हत्तीबेटावर वन विभागाची सेंट्रल नर्सरी व उर्वरित क्षेत्रावर याच वर्षी वृक्षांची लागवड करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

About The Author