वृक्षारोपण काळाची गरज- मुख्याधिकारी भारत राठोड
उदगीर (प्रतिनिधी) : सद्यस्थितीत नैसर्गिक ऑक्सिजनची गरज असून, ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या वृक्षांची आज गरज आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी वृक्षारोपणाचे कार्य हाती घ्यावे. असे आवाहन उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे. पर्यावरण दिना निमित्त उदगीर नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी नगरपालिकेचे अध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले ,वृक्षारोपण विभाग प्रमुख ज्योती वलांडे यांच्यासह सन्माननीय सदस्य, सुजान नागरिक उपस्थित होते. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक त्या सूचनांचे पालन करून कार्यक्रम राबविण्यात आला. पुढे बोलताना मुख्याधिकारी भारत राठोड यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. यादृष्टीने जिल्हाभरात वृक्षारोपणाचे नियोजन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ.. अरविंद लोखंडे त्यांनी सांगितले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली असून वृक्षारोपण आणि जलपुनर्भरण करणाऱ्या नागरिकांसाठी नगरपालिकेच्या वतीने संपत्तीवर आकारण्यात येणाऱ्या करांमध्ये सवलत देण्याचेही नगरपालिकेच्या वतीने ठरविण्यात आले आहे. या गोष्टीचा विचार करून उदगीर नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे. असे आवाहन भारत राठोड यांनी केले.