वसुंधरा संवर्धन संस्थेच्या पुढाकाराने सातगाव पठारावरील गावांमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाचे उदघाटन
पुणे (केशव नवले) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून , ‘वसुंधरा संवर्धन’ संस्थेच्या पुढाकाराने ‘द क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट’ व ‘मॅप्स इंडिया’ या तीनही संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने रेन हार्वेस्टिंग आणि झिरो गार्बेज या प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रम शनिवार दिनांक ५ जून रोजी आंबेगाव तालुक्यातील भावडी या गावी पार पडला.
आंबेगाव तालुक्यात सरासरी दरवर्षी 800 मीली पेक्षा जास्त पाऊस पडतो. तरीही डिसेंबरपासून अनेक गावात पाणी टंचाई जाणवते. अशावेळी शासकीय टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गावामध्ये अनेक बोरवेल असूनही त्या उन्हाळ्यामध्ये कोरडया पडतात. भरपूर पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून ते बोरवेल मध्ये सोडल्यास भूजल साठा वाढेल आणि उन्हाळ्यातही बोरवेल ला पाणी राहील असा विचार करून वसुंधरा संवर्धन संस्थेने भावडी, कारेगाव, थुगाव व कुरवंडी या चार गावात रेन हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे. पर्यावरणाच्या बदलामुळे भविष्यात पाणी टंचाई वाढणार आहे. प्रत्येकाने पाणी जपून वापरावे शासकीय स्तरावर काही मदत हवी असेल तर ती आपण करू असे आश्वासन पंचायत समिती सदस्य शितल ताई तोडकर यांनी उद्घाटन प्रसंगी दिले.
आपल्या भाषणामध्ये कर्नल शशिकांत दळवी म्हणाले, प्रत्येक गावाने पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला हवे. उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्या बरोबरच पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहिम यशस्वी करायला हवी. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प संबंधीची सविस्तर माहिती वसुंधरा संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र निंबाळकर यांनी दिली.
या प्रकल्पासाठी पर्यावरण व जलतज्ञ कर्नल शशिकांत दळवी आणि मॅप्स इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचे अनिरुद्ध तोडकर( आयर्न मॅन ) यांनी विशेष सहकार्य केले आहे. प्रकल्पासाठी ची आर्थिक तरतूद आयसीआयसी बँकेने केली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र पोलीस पाटील संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष व भावडी गावचे पोलीस पाटील गोरक्षनाथ नवले, स्वागत सरपंच महेश नवले तसेच आभार प्रदर्शन श्री प्रल्हाद कुदळे यांनी केले. कार्यक्रमासाठी वसुंधरा संवर्धन संस्थेचे सचिव योगेश शितोळे, सदस्य व क्राईम रिपोर्टर श्री केशव नवले, सामाजिक कार्यकर्ते सुनील तोत्रे, चारही गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.