जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून किलबिल च्या बालकांनी केले घरोघरी वृक्षारोपण..!!
अहमदपूर ( गोविंद काळे ) : 5 जून हा दिवस जगभर जागतिक पर्यावरण दिन म्हणुन साजरा केला जातो. पृथ्वीचे वाढते तापमान लक्षात घेऊन आज वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात शेतजमीन क्षेत्रफळ कमी होत असल्यामुळे वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. लहान मुलांच्या बालमनावर वृक्ष लागवडीचे व वृक्षसंवर्धनाचे धडे दिले तर भविष्यामध्ये यांच्यासाठी सावली मिळणार आहे म्हणून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळेने विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचा अनमोल संदेश देत ‘Selfie with Plantation’ हा उपक्रम राबविला. सदरील उपक्रमामध्ये २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. प्रत्येकानी घराच्या अंगणामध्ये, परिसरामध्ये किंवा शेतामध्ये झाडे लावली व त्याचा सेल्फी काढून शाळेकडे पाठवला. या उपक्रमाला शाळेतील सर्व स्टाफ व पालकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.