दलितावरील हल्ल्याच्या बाबतीत शासन उदासीन – निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)
उदगीर (प्रतिनिधी) : देशामध्ये दलित चळवळीला दडपून टाकण्यासाठी प्रस्थापिताकडून सतत हल्ले होत आहेत. याबाबतीत केंद्र शासनाने व देशातील अनेक राज्य शासन दलितावरील हल्ल्याच्या बाबतीत उदासीनता दाखवत आहे, ही गोष्ट लाजिरवाणी असून घटनेचा अवमान करणारी आहे. शासनाला या संदर्भात जाग आणण्यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल, असा इशारा एका निवेदनाद्वारे राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, उदगीर नगरपालिकेचे माजी सभापती तथा एम आय एम चे नेते निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाला दिले आहे. पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात देखील नांदेड जिल्ह्यातील आणि लातूर जिल्ह्यातील दोन घटना विचारवंतांना मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. तसेच भीम आर्मीचे नेते संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांच्यावर उत्तर प्रदेशातील देवबंद परिसरात कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद हे दिल्लीहून सहरानपुर मधील c छूटमलपुर येथील आपल्या घराकडे जात होते, हरियाणाची नंबर प्लेट असलेले एका कारमधून अज्ञात हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्यावर चार राऊंड फायर केल्या. या गोळीबारात चंद्रशेखर यांच्या कारच्या काचा फुटल्या व एक गोळी त्यांच्या पोटाला चाटून गेली. या हल्ल्यात ते बालमबाल बचावले असून या घटनेनंतर दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत, असे असून देखील शासनाच्या वतीने अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली नाही. हे अत्यंत लाजिरवाणी आहे.
दलित, मुस्लिम, ओबीसी या सर्व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय दलित अधिकार मंच देश पातळीवर आंदोलन छेडणार असून तशा आशयाचे निवेदन महसूल विभागामार्फत महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहे. अशी ही माहिती निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी दिली आहे. दलित, मुस्लिम, ओबीसी आघाडी निर्माण करून लोकांमध्ये जनजागरण करण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. वास्तविक पाहता दलित, मुस्लिम आणि ओबीसी एक झाल्यास कोणत्याही सरकारला खाली खेचायला वेळ लागत नाही. मात्र दुर्दैवाने गटातटाच्या राजकारणात विभागलेला हा समाज पुन्हा एकसंघ करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही निवृत्तीराव सांगवे यांनी सांगितले.