लिंबोळी खताच्या आडून अवैध देशीदारूचा धंदा !!कसा चालू देइल ग्रामीण पो. स्टे.चा बंदा ?
उदगीर (प्रतिनिधी) : अवैध दारू विक्री करून लाखो रुपये कमावण्याची हाव बाळगणाऱ्या व्यापाऱ्याला उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या वतीने चांगलाच धडा शिकवला आहे. अवैध देशी दारू विक्रीसाठी वेगवेगळ्या युक्ती आणि क्लृप्त्या लढवल्या जातात. तशाच पद्धतीने कोणालाही कसलाही संशय येणार नाही, आणि संशय आला तरीही अवैध देशी दारू सापडणार नाही. अशा पद्धतीची रचना करून एका ट्रकमध्ये जवळपास 30 लाख 45 हजार रुपयांची रॉकेट देशी दारू प्रवरा डिस्टिलरी प्रवरानगर जिल्हा अहमदनगर असे लेबल असलेल्या दारूचा मोठा साठा उदगीर ग्रामीण पोलिसांनी जप्त करून आपल्या कर्तबगारीचा उत्कृष्ट नमुना दाखवून दिला आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन साठी पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद पवार रुजू झाल्यापासून अपवादात्मक एक दोन बीट सोडल्यास, पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याच्या विरोधात सतत मोहीम राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुन्हे प्रकटीकरणाची शाखा सक्रिय झाली आहे. त्यामध्ये भरीस भर म्हणजे लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलीस उत्कृष्ट कार्य करत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी विशेष पथक करत आहे. या पथकाची कर्तबदारी म्हणूनच उदगीर ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज मोहीम राबवत अवैध देशी दारू सह 52 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या संदर्भात उदगीर ग्रामीण पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन नारागुडे यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उदगीर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू घेऊन ट्रक येणार आहे, अशी खबर लागली. यासंदर्भात सचिन नारागुडे यांनी आपल्या वरिष्ठांसोबत चर्चा केली. वरिष्ठांनी तातडीने हालचाल करण्याच्या दृष्टीने सूचना केली. लगेच विशेष पथक नेमून त्या पथकाला आवश्यक त्या सूचना केल्या. या पथकामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन नारागुडे, तुळशीराम बरुरे, राम बनसोडे, राहुल नागरगोजे, नामदेव चेवले यांचे पथक तयार केले. आणि मिळालेल्या माहितीची शहानिशा करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे या पथकाने सापळा रचला.
दिनांक 8 जुलै 2023 रोजी मध्यरात्री अव्वलकोंडा पाटी जवळ उदगीर नांदेड रोडच्या पूर्वेस जवळपास चार किलोमीटर अंतरावर गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे पोलिसांना अपेक्षित असलेला ट्रक (क्रमांक के ए 01/ए इ 6822) हा येत असलेला पोलिसांनी पाहिला. पोलिसांनी चौकशी केली असता पहिल्यांदा उडवा उडवीची उत्तरे मिळाली. तेव्हा सदरील ट्रक उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला. पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर त्या ट्रकची तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये लिंबोळी खताच्या तीनशे गोण्या आणि काळ्या रंगाची ताडपत्री व हे सर्व झाकण्यासाठी एक पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी आढळून आली. जेव्हा त्या तीनशे पोती गोण्या बाजूला करण्यात आल्या, तेव्हा त्या गोण्याच्या आडून रॉकेट देशी दारू प्रवरा डिस्टिलरी प्रवरानगर जिल्हा अहमदनगर असे लिहिलेल्या खपटी लेबल असलेले 870 बॉक्स आढळून आले. त्या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये 90 मिली च्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. प्रति बॉटल 35 रुपये प्रमाणे अंदाजे किंमत तीस लाख पंचेचाळीस हजार आढळून आले. या दारूच्या परवान्याच्या संदर्भात तसेच वाहतुकीच्या परवान्याच्या संदर्भात चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी रॉकेट देशी दारू 30 लाख 45 हजार आणि ट्रक 21 लाख व एक लाख पन्नास हजार रुपयांचा निंबोळी खताचा साठा आणि जवळपास चार हजार रुपयांची ताडपत्री असा एकूण 52 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आनंद नामदेवराव श्रीमंगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रफीयोदिन इस्माईल ए. (वय 52 वर्ष रा. 21/41 बारधी नगर मेट्रोपॉलिटन कोईमतुर, तामिळनाडू) आणि दुसरा आरोपी विजयन कृष्णकुट्टी अल्कपरंबील (वय 61 वर्ष रा. वुडिकल जिल्हा कन्नूर केरळ) या दोघांच्या विरुद्ध गु. र. न. 424/ 23 कलम 65 (अ) (इ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 81, 83, 90, 108 मदाका यासह 109 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तारू, सुमेध बनसोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर पडिले, व्यंकट शिरसे हे करत आहेत.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन नारागुडे, तुळशीराम बरुरे, राम बनसोडे, राहुल नागरगोजे आणि नामदेव चेवले यांनी उत्कृष्टपणे मोठ्या प्रमाणातील अवैध दारू विक्रीचे प्रकरण उघडकीस आणले असून या आरोपीताकडून अशा पद्धतीने अवैध दारू विक्री करणारे रॅकेट उघडकीस येऊ शकेल, अशी आशा उदगीर ग्रामीण पोलिसांना वाटत आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उदगीर ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.