विकासासाठी संजयभाऊ बनसोडे यांची गाडी सुसाट!!विरोधात बंद पडलेल्या नाण्यांचा खुळखुळाट !!!

विकासासाठी संजयभाऊ बनसोडे यांची गाडी सुसाट!!विरोधात बंद पडलेल्या नाण्यांचा खुळखुळाट !!!

रोखठोक (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय भाऊ बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत गटबाजी झाल्यानंतर अजित दादा पवार यांची बाजू घेतली, त्यांच्यासमोर उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची काळजी चिंता होती. त्यामुळे त्यांनी दादांची बाजू घेतली. कर्मधर्म संयोगाने त्यांना कॅबिनेट मंत्री पदही मिळाले. मात्र शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटातून आता ना. संजय भाऊ बनसोडे यांच्या विरोधात उमेदवार शोधण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. अजितदादा पवार गट, भारतीय जनता पक्षासोबत गेल्याने आता उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये संजय बनसोडे यांच्या विरोधात कोण? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. संजय बनसोडे यांनी गेल्या कित्येक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढला आहे. हरितक्रांतीचा पाया रचावा म्हणून तिरू प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी बॅरेजेसची उंची वाढवणे, हे मोठे काम त्यांनी केले आहे. त्याशिवाय उदगीर आणि जळकोट शहरांमध्ये प्रशासकीय इमारतींची काम युद्ध पातळीवर चालू आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून पोलीस वसाहतीचा प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे. याशिवाय तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन अशा विविध इमारती उभ्या राहत आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जवळपास दोन हजार कोटीचा विकास निधी आणल्याचे सांगितले जात आहे. उदगीरी विधानसभा मतदारसंघाला जोडणारे अनेक महामार्ग होत आहेत. तसेच मतदार संघाचे अंतर्गत रस्त्याचे जाळे सुद्धा मजबुतीकरण करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम चालू आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात विकास काम केल्यानंतर आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क या पार्श्वभूमीवर ना.संजय बनसोडे यांच्या विरोधात उमेदवार कोण देणार हा प्रश्न आहे? आभाळा एवढा विकासाचा डोंगर उभा केल्यानंतर आता काय म्हणून बनसोडे यांचा विरोध करणार? मात्र स्वार्थी काही मंडळी स्वतःच्या अस्तित्वासाठी म्हणून शरद पवार यांच्या गटात गेले आहेत. वास्तविक पाहता कित्येक कार्यकर्त्यांनी ना. संजय भाऊ बनसोडे यांच्याकडून प्रचंड फायदे करून घेतले, इतरांना कामे द्या म्हणून सांगितलेली कामेही त्यांनीच स्वतः करून घेतले असल्याची चर्चा आहे. आता आपले बिंग फुटू नये, म्हणून वेगळ्या गटात जाऊन टीका टिप्पणी करत आहेत असे बोलले जात आहे. मात्र त्या बंद पडलेल्या नाण्यांचा होणारा खुळखुळाट बाजारात चालणार नाही, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.

2019 साली संजय बनसोडे यांनी भारतीय जनता पक्षाचे डॉ. अनिल कांबळे यांचा 20579 मताधिक्याने पराभव केला होता. वास्तविक पाहता 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही संजय बनसोडे खचून न जाता पुन्हा मतदार संघातला जनसंपर्क वाढवला, आणि दांडग्या जनसंपर्काच्या आधारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

राजकारणातील अचानक झालेल्या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवारांचा गट आणि इतर काही पक्ष आता संजय बनसोडे यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यावा? या विवंचनेत आहेत. एका बाजूला संजय बनसोडे यांनी उभा केलेले विकासाचे मोठे काम! आणि मतदार संघातील प्रचंड जनसंपर्क!! शिवाय या बदललेल्या काळात भारतीय जनता पक्षाची मिळणारी साथ आणि विकासाला सहकार्य म्हणून काँग्रेस पक्षातील अनेक मतदारांनी संजय बनसोडे यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा केला. त्यावरून येणाऱ्या काळात काँग्रेस मधील अनेक मातब्बर नेते आणि कार्यकर्ते संजय बनसोडे यांच्या सोबत राहतील, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. अशा परिस्थितीत संजय बनसोडे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याच्या धडपडीत कोणीतरी उपरा उमेदवार विरोधासाठी विरोध म्हणून दिला जाऊ शकतो. मात्र तो मतदार संघात टिकाव धरेल का? हा मोठा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षातील एक मोठे प्रस्थ उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील हे देखील संजय बनसोडे यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पूर्वीच्या शरद पवार विचार मंचचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील आणि त्यांचे काही निवडक साथीदार हे शरद पवार गटासोबत असल्यामुळे संजय बनसोडे यांना विरोध करण्यासाठी ते उमेदवारांची शोधाशोध करतील अशी शक्यता नाकारता येत नाही मात्र त्यांच्यात सोबत असलेले चालू कार्यकर्ते त्यांचे काही चालू देतील का? हाही प्रश्न आहे.

कालपर्यंत ना.संजय बनसोडे यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल असे गृहीत धरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष गप्प होते.त्यांना आता हालचाल करावी लागणार आहे. एका अर्थाने संजय बनसोडे यांच्या विरोधातील उमेदवार म्हणजे बळीचा बकरा ठरेल!! अशीही चर्चा मतदारसंघात चालू आहे!!!

सर्वसामान्य मतदारांना या राजकीय बदलापेक्षा आपल्या भागाचा विकास व्हावा. हीच तळमळ असल्याने आणि संजय बनसोडे यांच्यामार्फत विकास कामे गतिमान होत असल्याने सर्वसामान्य मतदारही संजय बनसोडे यांच्याच बाजूने आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष, अजित दादा पवार यांच्या गटाचा राष्ट्रवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टी आठवले गट, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा शिवसेनेचा गट हे सर्वच संजय बनसोडे यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्यामुळे निर्विवाद पणे संजय बनसोडे यांची ताकद वाढलेली आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटूरे, उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब मरलापल्ले , शिक्षक काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बालिका मुळे यांनी ना. संजय बनसोडे यांना भेटून अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या हातून उदगीर विधानसभा मतदार संघाचा गतिमान विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ही पार्श्वभूमी पाहिल्यास आज घडीला तरी ना. संजय बनसोडे आजातशत्रू आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही.

विरोधासाठी विरोध करणारे मोठमोठ्या गोष्टी बोलत असले तरी, ते सर्व बिनसैन्याचे सेनापती आहेत, पूर्वी ना. संजय बनसोडे यांच्यामुळेच त्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हायचा, मात्र आता त्यांना कोणीही विचारणार नाही किंवा त्यांचे कोणीही ऐकणार नाही अशी चर्चा उदगीर, जळकोट विधानसभा मतदार संघात होत आहे.

About The Author