अहमदपूर( गोविंद काळे ) येथील नेहा सुरेश गुंडरे या युवतीची एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अहमदपूर येथील सुरेश गुंडरे व विजय माला गुंडरे या दांपत्याला दोन एकर कोरडवाहू जमीन आहे. यांना चार मुली व एक मुलगा व स्वतः दोघे असा सात सदस्यांचा संसाराचा गाडा या दोन एकर कोरडवाहू जमिनीच्या उत्पादनावर भागवावा लागायचा. आपले वडील इतर पालकाप्रमाणे पैसे खर्च करू शकत नाहीत ही जाणीव नेहाला लहानपणीच झालेली. सुरेश गुंडरे यांनी आर्थिक अडचणीमुळे आपल्या तीन मुलींचे शिक्षण बारावी पर्यंत झाल्यावर लग्न करून दिले. परंतु नेहा जिद्दी होती तिचे इयत्ता पहिली ते चौथीचे प्राथमिक शिक्षण मरशिवनी या लहानशा खेड्यात तर माध्यमिक शिक्षण अहमदपूर शहरातील विमलाबाई देशमुख शाळेत झाले. नेहाने परभणी येथील ज्ञान उपासक महाविद्यालयात बी.एस.सी.साठी प्रवेश घेतला. पदवीच्या द्वितीय वर्षापासूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा संदर्भात स्वतःच विविध ठिकाणी शोध घेऊन माहिती मिळविली. कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता स्पर्धा परीक्षेचे पुस्तके विकत घेऊन तयारी घरीच चालू केली. सन 2020 मध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या इतर मागासवर्गीय मुलींसाठी 43 जागा निघाल्या व त्यामध्ये तिने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवेदन पत्र दाखल केले. नेहाने या परीक्षेतील शारीरिक चाचणीमध्ये 92 गुण तर लेखी परीक्षेत 343 गुण मिळवून आपले स्थान निवड यादीत पक्के केले. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष रविकांत क्षेत्रपाळे, प्रा. रत्नाकर नळेगावकर, चंद्रकांत शिंदे, सय्यद सलीम, नरसिंग सांगवीकर, शिवाजी वाढवणकर, त्रिशरण मोहगावकर, गोविंद काळे यांची उपस्थिती होती.