विकासरत्न नामदार संजय भाऊ बनसोडे यांचा 14 जुलै रोजी नागरी सत्कार
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय भाऊ बनसोडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यमंत्री म्हणून उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव विकास निधी आणला. आता उदगीर विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळाल्यामुळे, विकासाला गती येणार असल्याने उदगीरेकरांना या गोष्टीचा आनंद होत आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने उदगीर येथे 14 जुलै रोजी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्याच्या नियोजित बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वरराव निटुरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती रामराव मामा बिरादार येनकीकर, महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशनचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत भाऊ चामले, शिवसेनेचे जिल्हा संघटक अॅड. गुलाब उर्फ बापूराव पटवारी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी वरील नेते रामभाऊ तिरुके, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भाऊ भोसले, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष डी. के. कांबळे, प्रकाश राठोड, अभिजीत औटे ,बाबुराव आंबेगावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीचे संचालन शाम डावळे यांनी तर आभार प्रा. प्रवीण भोळे यांनी मानले.
उदगीर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समर्थ नेतृत्व लाभले आहे. या नेतृत्वाला सर्वांनी जपावे. आणि पक्षीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन उदगीरच्या विकासाची जाण सर्वांनी जोपासावी. असे आवाहन या बैठकीच्या पूर्वीच भरत भाऊ चामले यांनी केले होते. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे ,मुन्ना पाटील, रामराव बिरादार यांनी पुढाकार घेऊन नागरी सत्काराच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणून 14 जुलै2023 रोजी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा नागरी सत्कार असल्याने, नामदार संजय भाऊ बनसोडे यांनी उदगीर शहराच्या आणि विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये विकास निधी आणला, उदगीर विधानसभा मतदारसंघाचा कधी नव्हे एवढा विकास होतो आहे. ही गोष्ट उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी अभिमानाची आहे. आपले नेतृत्व आता आणखी समृद्ध आणि शक्तिशाली होत आहे याचा अभिमान बाळगून, सर्व राजकीय पक्षाच्या नेते, कार्यकर्ते यांनी नागरी सत्कार सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रम उत्कृष्ट कसा होईल? या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी केले आहे.