राज्य सरकारच्या आशीर्वादाने विमा कंपन्यांना हजारोंचा फायदा तर शेतकर्‍यांच्या पदरी निराशा – माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे 

राज्य सरकारच्या आशीर्वादाने विमा कंपन्यांना हजारोंचा फायदा तर शेतकर्‍यांच्या पदरी निराशा - माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे 

लातूर (एल.पी.उगीले) : सध्या राज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारने पिक विम्याचे निकष बदलल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ 743 कोटी रुपये पिक विमा नुकसान भरपाई म्हणून मिळाली आहे. मात्र याच वेळी विमा कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. हे केवळ राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिलेल्या आशीर्वादामुळे घडले आहे! आणि या घोटाळ्यांमध्ये शासन आणि कंपन्या यांच्यामध्ये दलाली करणारे अनेक अधिकारी यांचा समावेश आहे. याचा तपास होणे गरजेचे आहे. विमा कंपन्यांना झालेल्या 4234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा हा शेतकर्‍यांमध्ये वाटला जावा. अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचे महामंत्री तथा राज्याचे माजी कृषिमंत्री डाॅ. अनिल बोंडे यांनी केली आ.

हे लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या वर्षीच्या खरिपाचा पिक विमा नुकसान भरपाई प्रकरणांमध्ये राज्यातील शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. हा विमा प्रकार शेतकर्‍या ऐवजी विमा कंपन्यांनाच हजारो कोटी रुपयांचा फायदा मिळवून देणार आहे! राज्यातील या सरकारने पीक विम्याचे निकष बदलल्याने, उंबरठा उत्पादन काढण्याची पद्धत बदल केली यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी केवळ 743 कोटी रुपये पडले आहेत, तर विमा कंपन्यांना भरमसाठ फायदा झाला आहे. हा फायदा मिळवून देणारे आणि निकष बदलणारे अधिकारी हे शासनाचे दलाल असून त्यांची कसून चौकशी केली जावी आणि विमा कंपनीच्या घशामध्ये टाकणाऱ्या हजारो कोटी रुपये कसे गेले? याचाही तपास करावा. अशीही मागणी डाॅ.बोंडे यांनी केली आहे.

 भाजप सरकारच्या काळात 85 लाख शेतकऱ्यांना 5795 कोटी रुपयांचा विमा मिळाला होता. पण या सरकारने मात्र शेतकरर्‍या ऐवजी विमा कंपन्यांचे भले करण्याचे धोरण घेतल्यामुळे शेतकरी नागवला गेला आहे.

 एकट्या लातूर विभागामध्ये 39 लाख 49 हजार शेतकऱ्यांनी विमा कंपन्या वर भरवसा ठेवून 2299 कोटी रुपये विमा कंपन्यांकडे भरले. त्यापैकी फक्त सात लाख 38 हजार शेतकऱ्यांना 482 कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला! त्यापैकी पाच लाख 98 हजार शेतकऱ्यांना 387 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. एकट्या लातूर विभागातून विमा कंपन्यांनी 1817 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. याचा अर्थ हे सरकार पण कंपनी धार्जिणे आहे.असा आरोप बोंडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपण मराठवाड्याभर दौरे करत असून जनजागृतीचे काम हाती घेतले आहे, असे सांगितले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रमेश आप्पा कराड, आ. अभिमन्यु पवार, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, रामभाऊ कुलकर्णी, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गोविंद चिलकुरे, शिवाजीराव पाटील कव्हेकर इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.

About The Author