अहमदपूर बाजारपेठेत कैऱ्या विक्रीसाठी दाखल
लोणच्यासाठी परराज्यातील कैरी ; गृहिणींची लगबग
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील बाजारपेठेत कैऱ्या विक्रीसाठी दाखल होत असल्याने महिलांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.सध्या महिला वर्गाची लोणचे टाकण्याची लगबग ही सुरु झाली आहे. दरवर्षीच्या पावसाळ्याच्या आधी लोणचे टाकण्याचे काम हे हाती घेण्यात येते. यंदा देखील हे काम हाती घेण्यात आले आहे. आता महाराष्ट्रासह परराज्यातील
विविध ठिकाणच्या कैऱ्या बाजार पेठेत विक्री साठी दाखल होवू लागल्या आहेत. लोणच्यासाठी लागणारे सर्व साहित्यासाठी बाजारपेठेत महिला वर्गाची पावले ही वळू लागली आहेत. प्रत्येक कुटुंबात भोजनाच्या ताटात हवेहवेसे वाटणाऱ्या चटकदार कैरीचे लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु आहे. आंबा म्हटलं कि कोणाच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय रहात नाही.
साधारणत: जून महिना सुरु असला की वर्षभर साठवूण ठेवता येईल, असे चटकदार कैरीचे लोणचे बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरु असते. त्यासाठी आवश्यक असलेले हळद, तेल, मीठ, हिंग, मोहरीचे पीठ, मसाल्याची खरेदी करण्यास सुरुवात असते. सध्या येथील बाजारपेठेत लोणच्यासाठी कैरी विक्रीसाठी उपलब्ध असून ढीगच ढीग पहावयास मिळत आहेत. घरोघरी गृहिणींची लोणचे तयार करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. लोणच्यासाठीच्या कैऱ्यांना मागणी वाढली असून दर्जा, आकार यानुसार दर आकारण्यात येत आहे. साधारणत: ४० ते ५० रुपये किलो दराने कैरी उपलब्ध आहेत. तर कैरीच्या फोडी करण्यासाठी २० रुपयांस प्रति किलो असा दर आहे.बाजारातून विकत आणलेल्या कैरी घरी स्वच्छ पाण्यात टाकल्या जातात. दुसऱ्या दिवशी धुवून फोडणी केली जाते. त्यानंतर हळद, मीठ, हिंग, तेल व मसाला तयार टाकून लोणचे तयार केले जात आहे. लोणच्या चिनी मातीच्या बरणीचा उपयोग केला जातो. त्यामुळे या कालावधीत चिनी मातीच्या बरणीस मागणी आहे. सध्या बाजारपेठेत लोणच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच कैऱ्या फोडून देणाऱ्यांकडेही गर्दी दिसून येत आहे.
गेल्या वर्षी कैऱ्याचे भाव ६० ते ७० रुपये किलो असे दर होते. मात्र यावर्षी गेल्या वर्षापेक्षा
कैऱ्याचे दर कमीआहेत. महाराष्ट्रासह हैदराबाद, रायचुट्टी, दामणचूर, तिरुपती, बेंगलोर, श्रीनिवासपूर, कृष्णानगरी आदी ठिकाणहून कैऱ्या मागविल्या जात आहेत, असे येथील फळ विक्रेते जावेद फकीरसाब बागवान यांनी सांगितले.