खरीप हंगाम तालुक्यात ३९ हजार हेक्टरवर होणार सोयाबीनचा पेरा.
पेरणीसाठी वाढीव दराचे सोयाबीन बियाणे घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनची तब्बल ३९ हजार हेक्टरवर पेरणी होणार असून, त्यासाठी २९ हजार २५०
क्विंटल बियाणे लागणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे बाजारात उपलब्ध आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी सिडस कंपन्यांना सोयाबीन कमी भावाने दिले. आता मात्र बियाणे म्हणून तेच सोयाबीन अव्वाच्या सव्वा भावाने शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात आहे. अनेक शेतकरी घरचे बियाणे पेरतो परंतु काहीना बाजारातूनच बियाणे विकत घ्यावे लागणार आहे.
शेतकऱ्यांकडे मुबलक सोयाबीन होते. त्या वेळी सोयाबीनचे भाव ४ हजार रुपये होते. सोयाबीन विकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांना राहात नाही. सोयाबीनच्या भरवशावरच शेतकऱ्याने अनेकांकडून उधारीवर औषधी बियाणे घेतलेले असते. त्याबरोबरच सोयाबीन सोंगणीपासून काढणीपर्यंतचे पैसे देणे लागत असल्यामुळे अनेक शेतकरी खळ्यावरुनच सोयाबीनची विक्री करतो. आता सोयाबीनला ७ हजार रुपये पेक्षा जास्त भाव आहे. यामध्ये अपवादात्मक काही शेतकरी वगळले तर साठेबाजांचेच भले होणार आहे. शेतकऱ्यांकडून कमी भावाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या बियाणे कंपन्या अव्वाच्या सव्या भावाने बियाणे विक्रि करत असल्याने सोयाबीनची भाववाढ शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.कृषि विभागाने आवाहन करूनही काही अपवाद वगळता शेतकरी घरचेच सोयाबीन बियाणे ठेवत असल्याचे दिसून येते. बियाण्यांबरोबर रासायनिक खताच्या किंमतीत देखील मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांनी गोठयात जनावरे ठेवली नाही. बैल तर बोटावर मोजता येईल एवढ्याच शेतकऱ्यांजवळ आहे. आता शेणखता ऐवजी रासायनिक खतावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
वाढलेल्या भावाचा फायदा
साठेबाजांना
गेल्या वर्षी सोयाबीनच्या एका बॅगची किंमत २१०० ते २२०० रुपये होती.यावेळी मात्र सोयाबीनच्या एका बॅगची किंमत ३३०० ते ३४०० रुपयांपर्यंत गेली आहे. एका बॅग मागे १२०० रुपायाची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसवणे कठीण जाणार आहे. गत दोन महिन्यांत सोयाबीनचे भाव वाढले असले तरी, सोयाबीनचे खाद्यतेल १७० रुपये किलो झाले आहे. वाढलेल्या भावाचा फायदा साठेबाजांना झाला आहे. तेलाच्या वाढत्या किंमती पाहता हंगामाच्या वेळीच शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वाढीव दर
द्यायला हवेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
बियाण्यांच्या दरात दुपटीने वाढ
रासायनिक खतांच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी आता खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांसाठी गत वर्षीच्या तुलनेत प्रति बॅग जवळपास १२०० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. घरी पेरणीसाठी सोयाबीन नाही आणि कमी किंमतीत मिळणारे महाबीजचे बियाणे अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना खासगी कंपनीच्या बियाणे खरेदी शिवाय या वर्षी पर्याय नाही. परिणामी सोयाबीन बियाण्यांच्या दरात दुप्पटीने वाढ झाली. या वर्षी बियाण्यांच्या अधिक मागणीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होवून शेतकऱ्यांना चढ्या दराने बियाणे खरेदी करावे लागत आहे.
राज्य शासनाच्या दराप्रमाणेच बियाणे, खत विक्री करावी
शासनाने निर्देशित केलेल्या दरा प्रमाणेच बियाणे व खतांची विक्री करावी. यावर निर्बंध घालण्यासाठी तालुक्यात भरारी पथक नियुक्त केले आहे.कृषी विभागाने तालुक्याच्या मोक्याच्या ठिकाणी रासायनिक खत व बियांणांचे भावफलक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लावले आहेत. तरी पण एखादा विक्रेता रासायनिक खत किंवा बी बियाणे
एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री करत असेल किंवा
कुठेही गैरप्रकार आढळल्यास संबंधित कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल. चांगले उत्पादन व्हावे. यासाठी शेतकऱ्यांनी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. भुजंग पवार, प्रभारी तालुका कृषी अधिकारी