दत्तवाडी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी! मोकाट गुन्हेगाराला जेलची वारी!!
पुणे (केशव नवले) : पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दहशत माजऊन गुन्हे करणार्या अट्टल गुन्हेगाराला विनापरवाना बेकायदेशीर पिस्तूल घेऊन फिरताना दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्या जवळून एक बेकायदेशीर पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी राहुल चंद्रकांत पवार याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पुणे शहरात आणि परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूचना दिल्यानंतर दत्तवाडी पोलिसांच्या पथकाने विशेष गस्त सुरू केली आहे.
यादरम्यानच दत्तवाडी पोलिसांना दांडेकर पुलाजवळ असलेल्या ट्रॅव्हल्स पॉईंट जवळ मोकळ्या जागेत एक इसम संशयास्पद थांबलेला असून तो गुन्हेगारी स्वरूपाचा वाटतो. अशी माहिती गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुळे, शरद राऊत यांना मिळाली. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन सापळा रचून राहुल पवार यास अटक केली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे आढळुन आली. राहुल पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरण अशा स्वरूपाचे गुन्हे यापूर्वीही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दत्तवाडी पोलीस पथकाने ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, प्रमोद भोसले, विष्णू सुतार, शिवाजी क्षीरसागर इत्यादींनी ही विशेष कामगिरी केली आहे. पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराला अटक केल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.